क्यूआरकोडच्या माध्यमातून मतदारांना ‍मिळणार केंद्राची माहिती

ठाणे : येत्या 20 मे 2024 रोजी नागरिकांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जाणे सोईचे व्हावे ‍किंबहुना आपले मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून मिळणार आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांच्या माध्यमातून Election Atlas for Thane District For General Parliamentary Elections -2024 ही बारकोड प्रणाली तयार करण्यात आली आहे.

यामध्ये 23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र क्यू आर कोड तयार करण्यात आले आहे. मतदार जर ठाण्यातील असेल तर त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी असलेला क्यू आर कोड स्कॅन केल्यास त्यावर ठाण्यातील सर्व मतदान केंद्र दिसतील. त्यानंतर मतदारांनी मतदार स्लीपवरील मतदान केंद्र क्रमांक क्लिक केल्यास मतदान केंद्र कुठे आहे,किती अंतरावर आहे, तसेच मतदान केंद्राकडे कसे जायचे याचा गुगल मॅप उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सहजरित्या पोहचता येणार आहे.

ही बारकोड प्रणाली जिल्हा समन्वय अधिकारी (संचार आराखडा) सुनील महाले, महेंद्रकुमार मेटकरी-परिवहन अभियंता, सिडको,अबू अमीर, उपविभाग अभियंता तसेच सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी (संचार आराखडा) अनिकेत खांडेकर, सहाय्यक अभियंता, सिडको, अभिषेक चव्हाण, सहाय्यक परिवहन अभियंता, सिडको, राहुल कापडणीस, सहाय्यक परिवहन अभियंता, सिडको यांनी तयार केली आहे.

मतदाराला मतदान केंद्रापर्यत जाणे सहज सोपे व्हावे व सदरचे क्यू आरकोड हे मतदारांपर्यत पोहचावे यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर, फेसबुक पेजवर, तसेच व्हॉटसॲच्या माध्यमातून याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येत आहे. तसेच भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघातील नागरिकांपर्यत विविध माध्यमातून सदर क्यू आर कोडची माहिती उपलब्ध केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले.