नवी मुंबई: स्वच्छतेच्या माध्यमातून नवी मुंबई शहराच्या आरोग्याची काळजी घेणा-या स्वच्छतासखींच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आरोग्यम् संस्थेने पुढाकार घेऊन स्वच्छताकर्मींविषयी आपुलकी दाखवत हे शिबीर आयोजित केल्याबद्दल प्रशंसा केली.
नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि आरोग्यम् सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नमुंमपा आयुक्त् डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात ‘’सन्मान मातृत्वाचा, स्वच्छतासखींचा आरोग्याचा” या शिर्षकांतर्गत आयोजित स्वच्छतासखींच्या आरोग्य तपासणी शिबीराप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करित होते. यावेळी घनकचरा व्यावस्थापन विभागाचे सहायक आयुक्त जयंत जावडेकर, आरोग्यम् संस्थेच्या प्रमुख शमिका सुतार व डॉ. राहुल वडके उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शंभराहून अधिक स्वच्छतासखींची रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन पातळी अशी विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली. 15 व 16 जून रोजी आरोग्यम् मार्फत आयोजित केल्या जाणा-या मोठया स्वरूपातील आरोग्य शिबीरात पुढील चाचण्या करणे गरजेचे असलेल्या स्वच्छतासखींच्या आवश्यक चाचण्या केल्या जाणार आहेत.