ठाण्यात झालेल्या राज ठाकरे यांच्या प्रचारसभेकडे सर्वांचे लक्ष होते. ते महायुतीच्या उमेदवारांसाठी कोणता मुद्दा घेणार याबद्दल कुतुहल होते. गेल्या खेपेस भाजपावर सडकून टीका केल्यामुळे यावेळी ते काय बोलतील याबाबत चर्चा होती. अखेर रविवारी त्यांची सभा झाली आणि त्यांनी परराज्यांतून येणाऱ्या लोंढ्यांबाबत नाराजी व्यक्त करताना चिंतेचा सूर आळवला. त्यांचे हे भाषण शिवसैनिकांना भावले असेल कारण गेल्या काही वर्षात मराठी माणसाची अस्मिता आणि भूमीपुत्रांचे न्याय हकक वगैरे हे मुद्दे बाजूला पडले होते. त्याचे कारणही स्वाभाविक होते. शिवसेना आणि भाजपा यांची युती ही व्यापक हिंदुत्वावर बेतली होती आणि थोडीथोडकी नाही तर 25 वर्षे टिकली होती. व्यापक हिंदुत्व म्हटले की हिंदू परप्रांतीयांना सामील करुन घेणे ओघानेच आले. त्यामुळे मराठी माणसाला कोणी वाली राहिला आहे काय असा प्रश्न उघडपणे मांडला जाऊ लागला. मराठी माणसाच्या मनात असलेली उपेक्षा, अन्याय आणि अवहेलनेची भावना धुमसत होती. परंतु त्यावर व्यापक राष्ट्रहितासमोर बोलणे टाळले जात होते. त्यावर बोलणे ‘पॉलिटिकली इनकरेक्ट’ अर्थात राजकीयदृष्ट्या चुकीचे ठरू लागले होते. हे ‘न्यू-नॉर्मल’ मराठी माणसाने नाराजीने का होईना स्वीकारले होते. अशावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या मूळ मुद्यात हात घालून मराठी मतदारांशी संधान बांधण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, तो महायुतीमधील घटक पक्षांना कितपत मान्य होईल हा प्रश्न आहे. या परप्रांतीयांच्या मनात शंकेचे भूत निर्माण करण्याचे काम प्रतिस्पर्धी महाआघाडी केल्याशिवाय रहाणार नाही. रेल्वे भरतीसाठी आलेल्या परप्रांतीयांविरुद्ध केलेले जुने आंदोलन मतदारांच्या लक्षात आणून देऊन परप्रांतीयांची एक मोठी मतपेढी महाआघाडी खेचू शकेल. राज ठाकरे यांनी विरोधकांच्या हाती कोलीत दिले आहे. त्याचा फटका बसू शकतो. किंबहुना भाजपाला ही जोखिम पहिल्यापासून दिसत होती. परंतु तरीही त्यांनी मनसेला बरोबर घेतले आहे. यांचा अर्थ महायुती एक ‘कॅलक्युलेटेड रिस्क’ घेण्यास तयार आहे हे स्पष्ट होते.
मराठी माणसाची अस्मिता धोक्यात आली आहे यात वाद नाही. परंतु त्यास पूर्णपणे परप्रांतीयांना जबाबदार धरता येणार नाही. मराठी माणसाने आक्रमक होण्यापेक्षा आग्रही रहायला हवे होते. मग तो विषय नोकरीचा असो वा व्यवसायाचा. या दोन्ही आघाड्यांवर मराठी माणसांत शिथिलता का आली? त्याचे खरे उत्तर एकच आहे, मराठी माणसाची सहिष्णुता आणि नेत्यांची उदासिनता, अस्मिता जीवंत ठेवताना मराठी माणूस आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम होईल हे मराठी माणसाच्या नेत्यांनी पाहिले नाही. ही खंत जितकी आज राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांना वाटत असेल त्याच्या किती तरी पट मराठी माणसाला वाटत आहे. तसे पाहिले गेले तर शिवसेनेच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या एक-दोन दशकांत मराठी माणसाच्या हीतासाठी जी धार होती ती पुढे बोथट होत गेली. आता तर या मुद्द्यातील त्रुटी आणि मर्यादा सर्वांच्या लक्षात आल्या आहेत. अशावेळी तो निवडणुकीचा मुद्दा होणे कठीणच!