अंबरनाथ-बदलापूरला जोरदार पाऊस

अंबरनाथ: अंबरनाथला सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. बदलापुरात गारांचा पाऊस पडला.

गेल्या अनेक दिवसांपासून कडक उन्हामुळे कमालीची उष्णता जाणवत होती. आज सोमवारी 13 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत कडक उन्हामुळे वातावरणात उष्णता वाढली होती, आणि अचानक दुपारी दोनच्या सुमारास ढग दाटून आले, वारा सुटला आणि काही क्षणात अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्याने हवेत गारवा निर्माण झाला.

पावसाआधी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शिवाजीनगर, वडवली आदी भागात जुनी झाडे तुटली, काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्याचे प्रकार घडले. पाऊस आणि वाऱ्यामुळे काही ठिकाणी विद्युत तारांचे नुकसान झाल्याने दुपारी दोननंतर विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता.