बराकपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (12 मे 2024) पश्चिम बंगालमधील बराकपूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी टीएमसी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच, सीएए, राम मंदिर आणि आरक्षणाबाबत राज्यातील जनतेला पाच गॅरंटी दिल्या.
आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले की, “आपला महान भारत देश टीएमसी, काँग्रेस आणि डाव्यांच्या हाती देता येईल का? मित्रांनो, टीएमसी आणि काँग्रेसची इंडिया आघाडी तुष्टीकरणाचे राजकरण करते. येथील तृणमूल आमदाराने हिंदूंना भागीरथीमध्ये बुडवू, असे म्हटले होते. कुणाच्या जीवावर ते एवढी हिंमत करतात? यांनी बंगालमध्ये हिंदूंना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवले. तुष्टीकरणासाठी ते एससी, एसटी आणि ओबीसींना दिलेले आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न करताहेत.”
“संदेशखलीतील आरोपीला तृणमूल काँग्रेसने वाचवण्याचा प्रयत्न केला. टीएमसीचे गुंड संदेशखलीतील माता-बहिणींना धमकावत आहेत. कारण काय, तर अत्याचार करणाऱ्याचे नाव शहाजहान शेख आहे. आज परिस्थिती अशी आहे की, बंगालमध्ये टीएमसी सरकार रामाचे नावही घेऊ देत नाही. सरकार रामनवमी साजरी करण्यास परवानगी देत नाही. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या लोकांनीही राम मंदिराविरोधात आघाडी उघडली आहे, अशी टीकाही मोदींनी यावेळी केली. तसेच, राज्यातील जनतेला पाच गॅरंटी दिल्या. जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही. जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत कोणीही सीएए रद्द करू शकणार नाही. जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत तुम्हाला रामनवमी साजरी करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कोणीही रद्द करू शकत नाही. जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांचे आरक्षण संपणार नाही.
यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस कुटुंबाने 50 वर्षे सरकारे चालवले, परंतु काँग्रेसच्या राजवटीत फक्त गरिबीत होता बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश. काँग्रेस आणि इंडियातील पक्षांनी पूर्व भारताला मागास सोडले. 2014 मध्ये आम्हाला संधी दिली अन् आम्ही देशाच्या पूर्व भागाला विकसित भारताचे ग्रोथ इंजिन बनवले,” अशी टीकाही त्यांनी केली.