भास्कर जाधवांना पाडण्याची, भाजपने तयारी केली सुरू

संभाव्य उमेदवार कामाला लागले

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर आता कोकणात विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात राजापूर विधानसभा मतदारसंघाची चर्चा सुरू असतानाच आता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आमदार असलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपकडून दवाखान्यात आला आहे. या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांना शह देण्यासाठी पुन्हा एकदा भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी तयारी सुरू केली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार डॉ. विनय नातू यांना महायुतीकडून उमेदवारी मिळावी, अशी मोठी मागणी कार्यत्यांनी केली आहे.

२००९ पर्यंत भाजपाचा बालेकिल्ला राहिलेल्या गुहागरवरती यंदा पुन्हा भाजपकडून दावा करण्यात आला आहे. कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघ एकेकाळी भाजप लढवत असे. याच विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार कै. तात्यासाहेब नातू यांनी तब्बल चार वेळा आमदारकी भूषवली होती. तात्यासाहेब नातू यांना मानणारा मोठा वर्ग आजही गुहागर तालुक्यात आहे. त्यानंतर या ठिकाणी चार वेळा भाजपकडून डॉ. विनय नातू हे आमदार राहिले आहेत. मात्र २००९ साली हा विधानसभा मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेच्या ताब्यात देण्यात आला आणि गणिते फिरली. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड विधानसभा मतदारसंघ हा बाद झाला. गुहागर विधानसभा मतदारसंघात खेड तालुक्यातील काही भाग येतो. भाजपकडून हा विधानसभा मतदारसंघ काढून घेण्याची मोठी किंमत युतीला आजवर चुकवावी लागली आहे.

राज्यात दोन वर्षांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. त्यामुळे आता शिवसेना भाजपा व अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय अशी महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा मतदारसंघ भाजपकडे यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गुहागरचे विद्यमान आमदार ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा आता या निवडणुकीत पराभव करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आता दावा करण्यात आला असून माजी आमदार डॉ. विनय नातू हे पुन्हा एकदा गुहागर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.