भिवंडीत आगरी, ओबीसी आणि मुस्लिम मतांसाठी चढाओढ

महायुती आणि महाविकास आघाडीत होणार टक्कर

ठाणे: भिवंडी लोकसभा मतदारसंघात तीन प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत महाविकास आघाडीचे सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे विरुद्ध महायुतीचे खासदार कपिल पाटील यांच्यात होणार असून या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, शहापूर, मुरबाड, कल्याण पश्चिम आणि भिवंडी ग्रामिण असे सहा विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोडतात. ११ लाख २२,२१५ पुरुष आणि नऊ लाख ४९,७५७ महिला असे एकूण २० लाख ७२,३१० मतदार या मतदारसंघात आहेत. भिवंडी पूर्व आणि पश्चिम या दोन मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार आहेत तर भिवंडी ग्रामिण, मुरबाड आणि शहापूर या मतदारसंघात मूळ भूमिपुत्र आगरी, ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहेत. कल्याण पश्चिम येथे शहरी भागातील वस्ती आहे. या मतदारसंघात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट प्रत्येकी दोन आमदार तर समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी अजित दादा पवार गट प्रत्येकी एक आमदार आहे.

विद्यमान खासदार कपिल पाटील हे तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांना राष्ट्रवादीचे बाळ्या मामा म्हात्रे यांचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. या मतदार संघातील भाजपचे आमदार किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यात मागील अनेक महिने शीतयुद्ध सुरु असून मुरबाड मतदार संघातील मते मिळविण्यासाठी श्री.कथोरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. श्री पाटील यांच्या विजयाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १५ मे ला जाहीर सभा होणार आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे बाळ्या मामाकरिता भिवंडी मतदार संघात मतदारांना आवाहन करण्यासाठी येणार आहेत. ही जागा जिंकण्यासाठी महायुतीचे नेते आणि आघाडीचे नेते रिंगणात उतरले असून कपिल पाटील आणि बाळ्या मामा यांचा जनाधार या मतदारसंघात असल्याने या दोन मातब्बर उमेदवारांमध्ये सामना होणार आहे. या सामन्याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

दोन्ही उमेदवार आगरी समाजाचे असून या सामन्यात खासदार श्री. पाटील याचा विजयाचा रथ बाळ्या मामा रोखतात कि श्री. पाटील विजयाचा षटकार मारतात, याची उत्कंठा मतदारांना लागली आहे.