ठाण्यातील एमआरआर रुग्णालयातील डॉक्टरांची कामगिरी
एमआरआर चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे व उच्चशिक्षित डॉक्टरांच्या टीममुळे अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही यशस्वीपणे हाताळल्या जातात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून लिंगप्पा या ब्रेन ट्यूमर असलेल्या 14 वर्षांच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
आर. लिंगप्पा हा सोलापूरजवळील एका खेडेगावातील मुलगा असून त्याला मागील तीन महिन्यांपासून डोकेदुखीचा प्रचंड त्रास होत होता, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. हळूहळू या त्रासात वाढ होऊन गेल्या महिन्यात त्याच्या डाव्या बाजूस थरथर निर्माण झाली. संपुर्ण वेळ त्याचा हात थरथरत राहायचा. विशेषतः हातात व हाताच्या बोटांमध्ये हा त्रास जास्त जाणवू लागला. पूर्णतःडावा हात निष्क्रिय झाल्यावर स्थानिक डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबाला एमआरआय करून घेण्याचा सल्ला दिला.
एमआरआयमध्ये मेंदूच्या उजव्या बाजूस असलेल्या थेलेमस या भागात मोठी गाठ (स्टिक सॉलिड इंट्रापॅरेन्कायमल ट्यूमर) आढळून आला. मेंदूच्या ज्या भागातून संपूर्ण शरीराला नियंत्रित केले जाते त्याच भागामध्ये ही गाठ असल्याने धोका जास्त होता. परंतु एमआरआर हॉस्पिटलमध्ये असलेल्या मॅजिक वाऊंड या अत्याधुनिक नेवीगेशन सिस्टीममुळे हे अवघड ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडणे शक्य झाले.
दोन ते अडीच सेंटीमीटरचे ओपनिंग असलेल्या मेंदूच्या या अत्यंत नाजूक भागात मायक्रोस्कोपच्या सहाय्याने ही गाठ काढण्यात आली. ही शस्त्रक्रिया तब्बल चार ते साडेचार तास सुरू होती. एमआरआर हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन व ब्रेन स्ट्रोक तज्ञ डॉ.उदय अंधार यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली.
शस्त्रक्रियेनंतर शुद्धीवर आल्यावर तत्काळ लिंगप्पाला होणाऱ्या वेदना व डोकेदुखी पूर्णतः बंद झाली व शस्त्रक्रियेच्या तिसऱ्याच दिवशी तो संपूर्ण वॉर्डमध्ये चालुही लागला. शस्त्रक्रियेच्या पाचव्या दिवशी त्याला घरी सोडण्यात आले. एमआरआर हॉस्पीटल व संपूर्ण टीमचे हे यश कौतुकास्पद आहे.
ठाणे येथील प्रसिध्द एमआरआर चिल्ड्रेन हॉस्पीटल हे अत्याधुनिक बालरुग्णालय आहे. एमआरआर रुग्णालयातील एनआयसीयु आणि पीआयसीयुचे व्यवस्थापन उच्चशिक्षित आणि उच्च अनुभवी कर्मचाऱ्यांनी युक्त असून आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हॉस्पिटलमध्ये तांत्रिकदृष्ट्या प्रगत कॅमेरे, हायब्रीड आणि मॉड्युलर ऑपरेटिंग रूम, डिजिटल मायक्रोस्कोप, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि लाईफस्टमिंग सुविधांसह अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स आहेत.