कल्याण तळोजा मेट्रो-१२ च्या कामाला वेग

– कल्याण पाठोपाठ डोंबिवलीतही मेट्रोच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला सुरुवात

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांचाच नव्हे तर संपूर्ण एमएमआर रिजनच्या वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या महत्त्वाकांक्षी कल्याण तळोजा मेट्रो 12 प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरु झाले आहे.

या प्रकल्पाचे फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच काही दिवसांत या मेट्रो १२ प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. सुरुवातील कल्याण एपीएमसी मार्केट रोड येथे या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. यानंतर सद्यस्थितीत डोंबिवलीच्या मानपाडा रोड परिसरातही मेट्रो 12चे काम सुरू झाले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक अधिक गतिमान व्हावी यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. यातीलच कल्याण तळोजा मेट्रो – १२ एक महत्वाचा प्रकल्प आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी तब्बल पाच हजार 865 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ठाणे आणि ठाणेपल्याड कल्याण-डोंबिवली या शहरांसाठीही मेट्रो मार्गाची उभारणी केली जाते आहे.

याअंतर्गत ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाची उभारणी वेगाने सुरू आहे. हा मार्ग पुढे कल्याणपासून डोंबिवली आणि कल्याण तालुक्यातील काही गावे तसेच पुढे तळोजापर्यंत जाणार आहे. एकूण २० किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून यात १९ स्थानके आहेत. हा मेट्रो मार्ग सुरु झाल्यावर नियमित स्वरूपात अडीच लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

या प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. यानंतर अवघ्या काही आठवड्याच्या कालावधीत प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. कल्याण एपीएमसी रोड आणि डोंबिवली मानपाडा मेट्रोच्या मार्गाच्या उभारणीचे काम सुरू आहे. याच बरोबर डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच कल्याण ते बदलापूर मेट्रो १४ या मार्गाच्या कामाला देखील सुरुवात होणार आहे. यामुळे कल्याण ते बदलापूर प्रवास देखील नागरिकांना अवघ्या काही मिनिटात करता येणार आहे.

या मार्गाच्या उभारणीमुळे कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्र, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग थेट नवी मुंबई, तळोजा या भागांशी जोडला जाणार आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमधील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

या स्थानकांचा असणार समावेश

कल्याण तळोजा (मेट्रो १२) अंतर्गत कल्याण, कल्याण एपीएमसी, गणेश नगर, पिसावली गाव, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे आणि कोळेगाव, निळजे गाव, वडवली (खुर्द), बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या स्थानकांचा समावेश असणार आहे.