रिक्षा प्रवासात हरवलेला मोबाईल ४० मिनिटांत सापडतो तेव्हा…

ठाणे : प्रवास करतात रिक्षात हरवलेला मोबाईल फक्त ४८ मिनिटांत जेव्हा सापडला तेव्हा पनवेल येथील एका सिव्हिल इंजिनियरच्या मनात ठाणे वाहतूक पोलिसांबद्दल ऊर भरून आला आहे.

ठाण्यातील वाहतूक पोलिसाच्या चमकदार कामगिरीमुळे चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला असून वाहतूक पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

पनवेल येथे वास्तव्यास असणारे राजेश जाधव (५१) हे आज सकाळी आपल्या कुटुंबासह वागळे इस्टेट येथील पासपोर्ट कार्यालयात आले होते. आपले काम आटपून पासपोर्ट कार्यालय ते ठाणे स्टेशन जाण्यासाठी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी रिक्षा पकडली. दरम्यान घाईघाईत सॅमसंग कंपनीचा अठरा हजाराचा मोबाईल रिक्षात राहिला असल्याचे लक्षात आले. त्यांनतर तत्काळ ठाणे स्टेशन येथील वाहतूक कार्यालयात जाऊन राजेश जाधव यांनी आपला मोबाईल हरवल्याची तक्रार दिली.

यावेळी आपले कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांनी आपली यंत्रणा कामाला लावली. प्रवीण जाधव यांनी तत्काळ सीसीटीव्हीच्या साह्याने रिक्षाचा नंबर शोधला तसेच रिक्षाचालकांचा मोबाईल नंबर मिळवला. त्यांनतर रिक्षाचालकाने फक्त ४० मिनिटांत मोबाईल पुन्हा आणून दिल्याने वाहतूक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

वाहतूक शाखेत काम करणारे प्रवीण जाधव यांनी याआधीही रिक्षात हरवलेल्या वस्तू मिळवून दिल्या आहेत. रिक्षात हरवलेले मोबाईल, मौल्यवान वस्तू, दागिने, लॅपटॉप, महत्वाची कागदपत्रे शोधण्यात त्यांचा हातखंडा आहे. ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी आदेश दिल्यानंतर पोलिस शिपाई गणेश धागडे यांच्या सहकार्याने हरवलेला मोबाईल शोधून काढण्यात यश आले असल्याचे जाधव यांनी सांगितले.