निद्रिस्त 40 टक्के!

भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष चारशेच्या वर जागा मिळवणार काय अशी चर्चा विरोधी पक्ष सातत्याने करुन एक प्रकारे मतदारांच्या मनात या दाव्याला फाजिल आत्मविश्वासाचे रुप देऊन संशयाचे वातावरण तयार करीत असतात. मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आणि लोकसभेच्या निम्म्या जागांचे भवितव्य मतदानयंत्रांत कैद झाले. त्यामुळे तर विपक्षांना सत्तारुढ पक्षाच्या दाव्याची खिल्ली उडवण्याची एक प्रकारे संधीच मिळाली. एकूण 543 जागांपैकी निम्म्या जागांसाठी मतदान व्हायचे आहे आणि त्यामुळे 273ची ‘मॅजिक फिगर’ तरी नरेंद्र मोदी गाठतील काय अशी मुत्सद्दी राजकीय खेळी विपक्षातर्फे खेळली जाऊ लागली आहे. हा त्यांच्या व्युहरचनेचा भाग असला तरी त्याला कोणत्या शास्त्राचा आधार नाही. ही अंदाजबांधणी जुन्या आकडे-वारीच्या ठोकताळ्यांनी केली जात असते. ज्या राज्यांत भाजपा-मित्र पक्षांना भरघोस आणि निर्णायक पाठिंबा मिळण्याची आशा आहे, उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यांवर सारी मदार असणार आहे. तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थिती आणि उत्तर-प्रदेशातील जात-धर्मनिहाय सुरु झालेले ध्रुवीकरण यांमुळे अपेक्षित जागा मिळणार नाहीत. त्यामुळे तीनशेपर्यंत पोहोचता-पोहोचता भाजपाची दमछाक होईल. असा एक तर्क केला जात आहे. जी माध्यमे मोदी-भक्त चालवत असल्याची टीका आहे त्यांचे अंदाज ‘चार-सौ’ पारला समर्थन देत असतात. तर ‘चाय-बिस्कुट’ म्हणून हिणवली जाणारी सत्तारुढ पक्षाविरुद्धची माध्यमे 220 ते 260 पर्यंतच गाडी जाईल असे छातीठोकपणे सांगू लागले आहेत. त्यांच्यापैकी कोणीतरी एक सपशेल तोंडावर आपटणार हे नक्की!
राजकारणावरील सर्व मजकूर चवीने वाचणारे, युट्यूब आणि वृत्तवाहिन्यावरील सर्व चर्चा कानाचे रान करुन ऐकणारे, लग्न असो की साखरपुडा, घर, कार्यालय, नाका, चहाचा ठेला असो की गुत्ता, सर्वत्र कोण जिंकणार, का जिंकणार किंवा कोण कसा हमखास पडणार, कोणी किती पैसे वाटले अथवा वाटलेच नाहीत, नेत्याने काय बोलायला हवे होते, यापेक्षा काय ‘मुर्खासारखे’ बोलला वगैरे अत्यंत अभ्यासपूर्ण प्रतिक्रियांचा भडीमार सध्या सुरु आहे. त्यावेळी एखादा पत्रकार उपस्थित असेल तर त्याच्याकडे अखेर मोर्चा वळतो आणि नेमक्या किती जागा येतील हो मोंदीच्या? हा प्रश्‍न हमखास विचारला जातो. पत्रकारांबद्दलची विश्वासार्हता कमी होत चालल्याची एकीकडे ओरड सुरु असताना त्यांच्याकडून विश्वासार्ह आणि वास्तववादी सत्य ऐकण्यास समाज असून इच्छुक आहे, हे अनुभवताना मन सुखावते खरे….पण तुम्ही मतदान का नाही हो करीत या पत्रकारांच्या प्रश्‍नांचे उत्तर कोण देणार हो? 40 टक्के झोपलेल्या मतदारांनी मनावर घेतले तर भल्याभल्या निवडणूक तज्ज्ञांचे अंदाज चुकतील. ते चुकावे इतके मतदान व्हावे हीच अपेक्षा. जे सरकार निवडून आले त्यात आपला सहभाग नव्हता किंवा विपक्षाचे हात बळकट केल्याचे श्रेयही घेता येत नसेल तर मग लोकशाही देशाचा जबाबदार नागरीक म्हणून मिरवण्यात काय अर्थ?