लग्नाच्या तगाद्यामुळे केले होते पलायन
ठाणे : घरच्यांनी लग्नाचा तगादा लावल्यामुळे, शिक्षण अर्धवट राहील या भीतीपोटी घर सोडून एक २१ वर्षीय तरुणी पळाली. मोबाईल नंबर, सोशल मीडिया, फेसबुक, व्हाट्सअप इंस्टाग्रामवर सुगावा तरुणीने लागून दिला नसताना, कळवा पोलिसांनी तिच्या आधारकार्डचा धागा पकडत मोठ्या कौशल्याने पाच वर्षानी तरुणीचा शोध नुकताच घेतला आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयातील बेपत्ता झालेली लहान मुले आणि तरुणींचा शोध घेण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. त्यानुसार कळवा पोलीस आपल्या हद्दीत कोण कोण बेपत्ता आहेत याचा शोध घेत होते. अशातच राणी शर्मा (२१) (बदललेले नाव) ही तरुणी २०१९ मध्ये बेपत्ता असल्याची तक्रार राणीच्या कुटुंबीयांनी दिली होती. गेल्या पाच वर्षांपासून आपल्या मुलीचा कोणताच ठावा ठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीय काळजीत होते. अनेक शंका तिच्या पालकांना भेडसावत होत्या. दरम्यान कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या मार्गर्शनाखाली राणीचा तपास सुरु केला. घर सोडतेवेळी आपल्याला कोणी शोधत येईल म्हणून राणीने स्वतःचा मोबाईल नंबर देखील कायमचा बंद करून टाकला
असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.
राणीला शोधण्याचे मोठे आव्हान कळवा पोलिसांसमोर होते. सोशल मीडिया फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम व इतर साधनांचा वापर करून देखील राणी मिळून येत नव्हती. अखेर पाच वर्षांपूर्वी घर सोडलेल्या मुलीला शोधण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले. राणीचा केवळ आधारकार्ड क्रमांक पोलिसांकडे होता. त्यानुसार तपासाची चक्रे सुरू होती.
मिळालेल्या माहिती आधारे राणीने एका बँकेत वैयक्तिक कर्जासाठी अर्ज केला असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तिची माहिती काढली असता राणी काल्हेरमध्ये रहात असल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलीस हवालदार प्रमोद इशी, मनाली आरज, योगेंद्र चव्हाण यांनी तिला नुकतेच शोधून काढले आहे.
उदरनिर्वाह करताना जिथे काम मिळेल त्या परिसरात राणी रहात होती. त्यामुळे ठाणे कल्याण, काल्हेर, आदी ठिकाणी तिचे वास्तव्य होते. राणीचा शोध घेतला असता ती सज्ञान असल्यामुळे, राणीने कुठे रहायचे हा सर्वस्वी निर्णय तिचा असणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.