ठाणे : ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत एकूण ७९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. खासदारकीच्या या शर्यतीत एकूण १३ रणरागिणी मैदानात उतरल्या आहेत. यामध्ये ४५ अपक्ष उमेदवार देखील आपले नशीब अजमावणार आहेत अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्ह्यात येत्या २० मे रोजी मतदान होणार असून यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ठाणे, कल्याण आणि भिवंडी या मतदारसंघात अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाण्यात एक, कल्याण दोन आणि भिवंडीतून नऊ जणांनी आधीच माघार घेतली आहे. यामध्ये काही प्रमुख पक्षासह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. भिवंडीत सर्वाधिक म्हणजे सहा महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर ठाण्यात दोनआणि कल्याण लोकसभेसाठी पाच महिला उमेदवार रिंगणात आहेत.
भिवंडी मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे व अपक्ष उमेदवार निलेश सांबरे अशी तिरंगी लढत होणार आहे. मात्र यामध्ये कपिल पाटील आणि कपिल जयहिंद पाटील तर सुरेश गोपीनाथ म्हात्रे आणि सुरेश सीताराम म्हात्रे अशा एकाच नावाच्या दोन जोड्या रिंगणात उतरल्या आहेत.