केळीवाल्याने केला नकली नोटांचा भांडाफोड

१३ हजारांच्या नकली नोटा हस्तगत

कल्याण : किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देऊन त्या चलनात आणणाऱ्या एका तरुणाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे.

अंकुश सिंह असे या आरोपीचे नाव असून तो दिल्लीत रॅपिडो बाईक चालवितो. तो मुंबईत आपल्या नातेवाईकाकडे आला होता व पुन्हा दिल्लीकडे परतीचा प्रवास करत असताना कल्याण स्टेशनवर एका केळी विक्रेत्याकडून केळी घेऊन नकली नोट दिल्याने केळी विक्रेत्याने हा प्रकार उघडकीस आणत कल्याण महात्मा फुले पोलिसांना माहिती दिली.

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी आरोपी अंकुश सिंगला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याच्याकडून १३ हजाराच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यात १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नकली नोटांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अंकुश सिंह याला या नकली नोटा बाजारात चालवण्यासाठी दिल्या होत्या. त्या नंतर त्याला कमिशन काढून पुढे मोठ्या प्रमाणात बाजारात नकली नोटा चालवण्यासाठी देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सध्या या प्रकरणात कल्याण महाात्मा फुले पोलिस आणि एनआयए यामागे मूळ सूत्रधार कोण याचा शोध घेत असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.