ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, गावे यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेने विविध उपाययोजना आखल्या आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील विहिरी आणि कूप नलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगाने कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाणी बचतीची आवश्यकता आहे. म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे, पाण्याने साफसफाई करणे यास मनाई करण्यात आली आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात, १० जून२०२४ पर्यंत दूचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने, मोठी वाहने धुणे, तसेच पाण्याने साफसफाई करणे या कामांवर पालिकेने निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करून पाणीबचत करावी, असे आवाहन महापालिकेने केले. शक्यतो दररोज गाड्या धुतल्या जाऊ नयेत. त्याऐवजी बोअरवेलच्या पाण्याने ओल्या केलेल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात, अशी सूचना महापालिकेने नागरिकांना केली आहे.