ऐकून घेऊ सगळ्यांचं…एक मत देऊ जबाबदारीचं…

बचतगटातील महिलांनी दिला संदेश

ठाणे: ऐकून घेऊ सगळ्यांचं…एक मत देऊ जबाबदारीचं… महिला बचतगट हे महिलांचे संघटन आहे. या महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो. या संपर्काचा वापर करुन महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती कशी करावी व मतदानातील महिलांचा सहभागाचा टक्का कसा वाढवावा या विषयी स्वीप पथकाकडून नुकतेच महिला बचत गटांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर ठाणे शहरात २५ ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत १४८ -ठाणे विधानसभा मतदार संघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी व मतदान जनजागृती करण्यासाठी शनिवार,४ मे २०२४ रोजी महिला बचतगटाच्या माध्यमातून बचतगटातील महिला सदस्यांचा मतदान जनजागृती कार्यक्रम दादा पाटीलवाडी, ठाणे येथे आयोजित केला होता.

मतदान जनजगृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या बचतगटातील महिलावर्गाला मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा. या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचेही वाटप करण्यात आले.

मतदानामध्ये सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. एकही महिला मतदानापासून वंचित राहू नये.शहरातील महिलांना मतदानासाठी सहभागी करून घेण्यामध्ये महिला बचत गटांनी सहभाग द्यावा. बचत गटाच्या माध्यमातून बचत गटाच्या सदस्य, तुमच्या आजूबाजूला राहतात त्या महिला, कुटुंबातील सदस्य, नव मतदार आणि नागरिक यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि सर्वानी न चुकता २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहन सर्व महिलांना करण्यात आले.

दादा पाटीलवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली. यावेळी ८२ वर्षीय सिता राऊत यांनी मी २० मे रोजी मतदान करणार आणि इतरांनाही मतदान करायला सांगणार असे नमूद केले. यावेळी सामूहिक मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.

कार्यक्रमासाठी प्रतिमा महालक्ष्मी, इच्छापूर्ती, वैभवलक्ष्मी, अनमोल आणि नर्मदा या सर्व बचतगटातील महिला उपस्थित होत्या. त्या सर्व महिलांनी ऐकून घेऊ संगळ्यांच…एक मत देऊ जबाबदारीचं… असा संदेश देत सर्व नागरिकांना २० मे रोजी मतदान करण्याचे आवाहन केले.