नवी मुंबई: सध्या उन्हाळ्यात प्रचंड तापमान वाढल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून अती दाबाने वीज जाण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशाच प्रकारातून वीज गेली म्हणून नागरिकांना राग अनावर झाला आणि त्यांनी महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण केली.
नवी मुंबईतील महावितरणच्या बेलापूर शाखेतील कर्मचाऱ्यासोबत मारहाणीचा प्रकार घडला आहे. गेलेली वीज नियमित करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला संतप्त नागरिकांनी मारहाण केली आहे. आलेल्या कर्मचाऱ्याला वीज गायब होत असून याचा आम्हाला त्रास होत आहे, असे सांगून शिवीगाळ करत थेट मारहाण केली.
या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी महावितरण सीबीडी बेलापूर शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रफुल कापसे यांनी केली आहे.