परदेशी नोकरीचे आमिष दाखवून २०० जणांची करोडोंची फसवणूक

भाईंदर: सोशल मिडिया आणि वर्तमानपत्रातील जाहिरात पाहून देशाच्या विविध राज्यातून परदेशी नोकरीसाठी मीरा-भाईंदरमध्ये आलेल्या 200 पेक्षा जास्त कामगारांना नोकरीसाठी परदेशात पाठवण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हजारो रुपये प्रत्येकी घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली होती. या घटनेबाबत संबंधितांनी नवघर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. पण पुराव्यांअभावी कारवाई होऊ शकत नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र आ. गीता जैन यांनी पाठपुरावा सुरू करताच गुन्हा दाखल होऊन कारवाईला सुरुवात झाली.

हजारो रुपयांची फसवणूक होऊनही मदत मिळत नसल्याने हताश झालेल्या सर्व पीडितानी, स्थानिक आमदार गीता जैन यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन, घडलेला सर्व प्रकार सांगितला. याबाबत पोलीस कारवाईमध्ये दिरंगाई होत असल्याचे त्यांनी सांगितले आणि न्याय मिळवून देण्याची विनंती केली. आमदार गीता जैन यांनी त्वरित पोलीस आयुक्तांशी संपर्क करून त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच नवघर पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसह स्वतः भेट देऊन पोलीस प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करून त्वरित कारवाई करण्याची आग्रहाची मागणी केली.

पोलिसांनी तातडीने, जेसल पार्क स्थित, ‘ईगल प्लेसमेंट’ नांवे असलेल्या कार्यालयावर छापा मारून, त्यामध्ये १३५ लोकांचे पासपोर्ट मिळवले. हे सर्व पासपोर्ट पोलिसांनी त्वरित पीडितांना सुपूर्द केले. सदर प्रकरणात आरोपी साहिल शेख, सुरुची मॅडम, नरसुल्लाह अहमद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच विविध पीडित लोकांकडून जे पैसे उकळले, त्या अनुषंगाने आरोपींची संबंधित दोन बँक खाती सील-फ्रिज करून ताब्यात घेण्यात आली आहेत.

आमदार गीता जैन यांच्या प्रयत्नामुळे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई केली व फसवणूक झालेल्या लोकांचे पासपोर्ट त्यांना मिळवून दिले. तसेच कारवाई होईपर्यंत या लोकांची राहण्याची व्यवस्था आमदारांच्या माध्यमातून करण्यात आली. पीडितांचे बुडालेले पैसे आता किती लवकर परतावा स्वरूपात मिळू शकतील याबाबत पुढील प्रयत्न सुरू आहेत.