ठाणे: राज्यात आणि देशात झालेल्या निवडणुकीच्या दोन टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला असून हा टक्का वाढवण्यासाठी शासकीय यंत्रणेचेही कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रयत्नांचे फलीत मतदानाच्या रुपात होईल का याकडे आता लक्ष लागले आहे.
विशेषतः ठाणे जिल्ह्यातील भिवंडी वगळता ठाणे व कल्याण लोकसभेसाठी सर्वात कमी मतदान होत असल्याचा अनुभव आहे. त्यातच सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने या मतदार संघातील टक्का कसा वाढेल याकडे सर्वच राजकीय पक्षांकडून त्याकडे सर्वाधिक लक्ष दिले जात आहे.
लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. या महाउत्सवात उमेदवारी मिळवण्यापासून विजयश्री खेचून आणण्यासाठी उमेदवार सज्ज होताना दिसत आहेत. तिन्ही मतदारसंघात विद्यमान खासदार पुन्हा आपले नशिब आजमवत आहेत. यावेळी केवळ विजय मिळवत हॅट्रीक साधणे हा उद्देश नसून आपल्या मताधिक्यात वाढ करून ताकद दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. अर्थात त्यांना आव्हान देण्यासाठी विरोधी उमेदवारही आपली सर्व शक्ती पणाला लावणार आहे. यात कोण बाजी मारणार हे निवडणुकांचे निकाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. पण त्याआधी मतदारांमध्ये जनजागृती करून त्यांना मतदानासाठी घराबाहेर काढणे महत्वाचे ठरणार आहे.
महामुंबईत येणार्या ११ लोकसभा मतदारसंघापैकी ठाणे व कल्याणमध्ये सर्वाधिक कमी मतदान २०१९ साली झाले होते. २०१४ सालीही हीच परिस्थिती होती. येथील मतदान ५० टक्क्यांपर्यंतही पोहचत नसल्याने ते वाढवण्याचे खरे आव्हान आहे. दुसरीकडे राज्यात आतापर्यंत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीकडे लक्ष दिल्यास यावेळीही मतदान कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रात होणार्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी शासकीय यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी गेल्या महिन्याभरापासून काम करत आहे. यामध्ये मतदारसंख्या वाढवण्याची पहिली परीक्षा जिल्हा प्रशासनाने पार केली आहे. शेवटच्या महिन्यात लाखभर मतदार त्यामुळे वाढले. पण वाढलेले मतदार मतदानकेंद्रांपर्यंत कसे पोहचतील हे पहावे लागणार आहे.
मतदान वाढवण्यासाठी प्रशासनाने अधिकारी, कर्मचार्यांची मोठी फळी उभी केली आहे. हे पथक महिन्याभरापासून शाळेपासून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान जागृतीची मोहिम सांभाळत आहे. नववर्ष स्वागत यात्रेतही मतदान जागृतीचे चित्ररथ साकारण्यात आले होते. पालकांना मतदानासाठी आवाहन करणारी पत्रे विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्यात आली. बँका, सामाजिक संस्था, अंगणवाडी अशा सर्वच घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न यामुळे झाला. प्रभात फेर्याही अनेक ठिकाणी काढून पथनाट्याद्वारेही मतदान जनजागृती करण्यात आली.
२० मे रोजी मतदान होणार आहे. पण हाच काळ उन्हाळी सुट्ट्यांचा असून लाखो मतदार यावेळी आपले गाव गाठतात किंवा पर्यटनाला जातात. शनिवार, रविवारी आणि सोमवार अशा तीन दिवस सलग सुट्ट्या आहेत त्यामुळे अनेक जण सहलीला जातात याचा फटका मतदानाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बदलत्या राजकारणाचा चिखल झाला असून त्यामुळे मतदारांमध्ये कमालीची निरुत्साह दिसत आहे. आतापर्यंत ज्या पक्षाला मत दिले त्याचेच दोन तुकडे झाले. त्यामुळे अनेक मतदारांच्या मनात मतदानाविषयी कटूता निर्माण झाली असल्याचे दिसून येते.
ठाणे जिल्ह्यातील २००९ पासून ते २०१९ पर्यंत झालेल्या निवडणुकांचा आढावा घेतला असता मतदानात वाढ होताना दिसते. यामध्ये भिवंडीमध्ये सर्वाधिक ५० टक्क्याहून अधिक मतदान होताना दिसत आहे. पण दुसरीकडे ठाणे अजूनही ५० टक्के मतदानापर्यंत पोहचलेले नाही. तर कल्याण लोकसभेत जेमथेम ४५ टक्केच मतदान होत आहे.
मतदानाचा आलेख (टक्केवारीत)
मतदारसंघ २००९ २०१४ २०१९
ठाणे ५०.०८ ५०.८५ ४९.३७
कल्याण ३४.३२ ४३.०६ ४५.३१
भिवंडी ६८.७१ ५१.६१ ५३.०७