वसई किल्ल्यात दहशत निर्माण करणारा बिबट्या जेरबंद

भाईंदर : मागील २५ दिवसांपासून वसई किल्ल्यात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे.

मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. २९ मार्च रोजी वसई किल्ल्यात बिबट्या आढळून आला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून जनजीवन विस्कळीत झाले होते. याशिवाय या भागात नागरिकांच्या पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती.

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने किल्ला परिसरात आवश्यक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे, रेस्क्यू टीम, पिंजरे लावले होते. मात्र मानवी वाहतूक व इतर समस्यांमुळे 20 ते 25 दिवस उलटूनही हा बिबट्या सापडला नाही. त्यानंतर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्याच्या आराखड्यात सातत्याने बदल करत बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यानुसार पिंजरे लावले. अखेर मंगळवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

तब्बल २५ दिवसांनंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून, गेल्या महिनाभरापासून दहशतीमध्ये असलेल्या वसई किल्ला परिसरातील किल्ला बंदर आणि पाचूबंदर येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.