ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत (युपीएससी) उत्तीर्ण झालेल्या खारटन रोड परिसरात राहणाऱ्या सफाई कामगाराच्या मुलाची भव्य मिरवणूक काढून रहिवाशांनी आनंद व्यक्त केला. या परीक्षेत उत्तीर्ण होणारा या भागातील हा पहिलाच विद्यार्थी आहे.
प्रशांत भोजने हा तरुण युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची खबर येताच या भागातील तरुणांनी एकच जल्लोष केला. काल संध्याकाळी दिल्ली येथून ठाण्यात परतलेल्या प्रशांत याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. या भागातील तरुणांनी प्रशांतची खारटन रोड भागात मिरवणूक काढली होती. आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या मिरवणुकीत येऊन त्याचा सत्कार केला. तर आमदार संजय केळकर यांनी त्याची भेट घेऊन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भाजपाचे जयेंद्र कोळी यांनी देखिल त्याला शुभेच्छा दिल्या. प्रशांत याचे वडील सुरेश भोजने आणि आई हे दोघेही ठाणे महापालिकेत सफाई कामगार आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले आहे. प्रशांत हा लहानपणापासून हुशार होता. तो आयटी अभियंता असून भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे त्याचे स्वप्न होते. तसा इरादा त्याने आई-वडिलांकडे स्पष्ट केला होता. त्यासाठी त्याने युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेऊन चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्याने सातव्या प्रयत्नात ही परीक्षा पास केली. या भागातील लफाटा चाळ येथे राहून त्याने त्याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्या आई-वडिलांनी घेतलेल्या मेहनतीला फळ आले असून खारटन रोड परिसरातून युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा त्याने इतिहास घडवला आहे. त्याकरिता त्याने बारा-बारा तास अभ्यास करून आमचे स्वप्न साकार केले, अशी प्रतिक्रिया त्याचे वडिल सुरेश भोजने यांनी दिली.