संजय राऊतांचे श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप
मुंबई : श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशीची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रधानमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे. ठाण्यातील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मदाय आयुक्तांकडे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी अशी तक्रार केली आहे.
श्रीकांत शिंदे फाउंडेशनमार्फत गरजूंना रोख स्वरूपात मदत केली जाते, त्याचबरोबर मनोरंजनाच्या अनेक भव्य कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते. याचा खर्च कोट्यवधीमध्ये आहे. हा खर्च नेमका कोणत्या माध्यमातून येतो यावर धर्मदाय आयुक्तांनी प्रकाश टाकायला हवा, असे पत्र संजय राऊत यांनी प्रधानमंत्री यांना लिहिले आहे. हे प्रकरण गंभीर असून तत्काळ गुन्हा नोंद करून साधारण 500 ते 600 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी तत्काळ ईडी, सीबीआयकडे देऊन गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
नगरमधील 35 मुलांना 90 लाखांचे अर्थसहाय्य दिले. गणेश उत्सवासाठी 500-600 एसटी गाड्या बुक केल्या गेल्या. याचे पैसे कोणी भरले हा मुद्दा आहे. बाळराजांच्या फाउंडेशन करता कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहेत. हे सरकारचे बाळराजे आहेत. चंदा दो धंदा लो याच माध्यमातून हे पैसे गोळा करत आहेत. धर्मदाय आयुक्त प्रचंड दबावाखाली असून पाच महिन्यांपासून माहिती दिली जात नाही असेही संजय राऊत म्हणाले.
श्रीकांत शिंदे यांच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात 40 ते 50 लाखांची उलाढाल होते. पण त्यांनी खर्च दाखविला आहे. त्यांच्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत. हे पैसे कुठून येतात? हे दानशूर आणि कर्णाचे अवतार कोण आहेत? त्याचा हिशोब व्यवहार धर्मदाय आयुक्तांकडे नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. मुख्यमंत्री कार्यालयात बसून बिल्डर ठेकेदारांना तुम्ही कंत्राट देत आहात. राजांच्या जवळच्या व्यक्तीला आठ हजार कोटींचा रुग्णवाहिका कंत्राट दिले. फाउंडेशनच्या माध्यमातून रोखित पैसे वळवायचे आणि हा पैसा राजकारणात वापरायचा. गद्दार आमदार खासदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी हा पैसा वापरला जातोय. उद्याच्या निवडणुकीसाठी हा पैसा वापरला जातो, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर केला.