नवी मुंबई : कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री होत आहे. त्यामुळे ग्राहकांना अस्सल हापूस आंबा मिळावा आणि शेतकऱ्याला चांगला दर मिळावा यासाठी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ‘क्यू आर’ कोड उपलब्ध करून दिले आहेत. मात्र असे क्युआर कोड लावलेले आंबे एपीएमसी फळ बाजारात अजूनपर्यंत दाखल झाले नसल्याने ग्राहकांना या आंब्यांची प्रतीक्षा आहे.
कोकणातील हापूस आंब्याची अविट चव सर्वांना सुपरिचित आहे. त्यामुळे हा आंबा खरेदी करण्याकडे ग्राहकाचा अधिक कल असतो. मात्र हापूसची वाढती मागणी पाहता काही व्यापारी मागील काही वर्षांपासून कोकण हापूससोबत कर्नाटकी आंब्याची भेसळ करून ग्राहकांच्या माथी मारत आहेत. आता कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेच्या माध्यमातून
कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी हापूस या नावाने जीआय (भौगोलिक निर्देशांक) मिळाले आहे. त्यामुळे
ग्राहकाला दर्जेदार हापूस मिळावा यासाठी सुमारे दोन वर्षांपूर्वी उत्पादक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांच्या संकल्पनेतून क्यू आर कोड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात काही त्रुटी जाणवल्या होत्या. त्यामध्ये क्यू आर कोडला एक्सपायरी डेट नसल्यामुळे तो पुन्हा वापरला जाण्याची शक्यता होती. त्याचा पूनर्वापर करून गैरफायदा घेतला जाऊ शकत होता. या त्रुटी दूर करून यंदा क्यू आर कोड नव्याने निर्माण केले आहेत. त्यामुळे आता असे आंबे बाजारात दाखल होताच त्याचा क्यू आर कोड तपासला असता आंब्याची खरी ओळख पटेल. मात्र कोकणातील आंब्याला असे क्यू आर कोड लावले असले तरी असे आंबे अजून वाशीतील एपीएमसी फळ बाजारात दाखल झालेले नाहीत.
क्यूआर कोडमध्ये काय असेल माहिती?
क्यूआर कोड तपासणी केल्यास आंब्याची मुदतबाह्य (एक्सपायरी) तारीख, आंबा पॅकिंगची तारीख, आंबा परिपक्व होण्याची तारीख, हापूस आंबा बागायतदाराची सविस्तर माहिती म्हणजे बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्याची माहिती त्यांचे मोबाइल नंबर, ई-मेल वगैरे अनेक आवश्यक गोष्टी कोडमार्फत मिळू शकतात.