अभिनेत्री सोनाली खरे यांच्या हस्ते ठाणे चैत्रोत्सवाचे उदघाटन
ठाणे : विश्वास सामाजिक संस्था आणि युनिव्हर्सल ट्रेड एक्स्पोने आयोजित केलेले गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्रीसाठी ‘ठाणे चैत्रोत्सवा’चे उदघाटन अभिनेत्री सोनाली खरे यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन १२ ते २१ एप्रिल दरम्यान गावदेवी मैदान, स्टेशन जवळ, ठाणे (प.) येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत भरवण्यात आले आहे.
सरिता सोमण आणि अमित गोडबोले यांचे युनिव्हर्सल ट्रेड एक्स्पो या कंपनीतर्फे भरवले गेलेले भव्य प्रदर्शन चैत्रोत्सव ठाणे याचे यंदाचे दुसरे वर्ष असून एकाच छताखाली हजाराहून जास्त वेगवेगळे प्रॉडक्ट्स नागरिकांना बघायला मिळणार आहे. ठाणे चैत्रोत्सवाचे उद्घाटन मायलेक चित्रपटाच्या निमित्ताने आलेल्या अभिनेत्री सोनाली खरे यांनी केले. यावेळी विश्वास सामाजिक संस्थेच्या वृषाली वाघुले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी अभिनेत्री सोनाली खरे यांनी चैत्रोत्सवाबद्दल बोलताना सांगितले की, या चैत्रोत्सवाच्या माध्यमातून अनेक छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळाले आहे. स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ मिळाली आहे. यावेळी त्यांनी सरिता सोमण आणि अमित गोडबोले यांनी हे व्यासपीठ उद्योजकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांनी सर्व उद्योजकांना भेटून शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी युनिव्हर्सल ट्रेडच्या सरिता सोमण यांनी सांगितले की, या चैत्रोत्सवात हजाराहून अधिक उत्पादने एकाच छताखाली बघायला मिळत आहेत. त्यामुळे ठाणेकरांनी या चैत्रोत्सवाला अवश्य भेट द्यावी. तसेच विश्वास सामाजिक संस्थेच्या वृषाली वाघुले यांनी सांगितले की, या चैत्रोत्सवात अनेक महिला उद्योजिका देखील सहभागी झाल्या आहेत. या महिलांना हातभार म्हणून ठाणेकरांनी येथे एकदातरी अवश्य भेट देऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे.
ठाणे चैत्रोत्सव हे कुटुंबातील सर्वांसाठी स्वदेशी उत्पादनांचा प्रशस्त असा मॉल असणार आहे. येथे ऑरगॅनिक मिलेट्स, इनडोअर नर्सरी, आईस्क्रीम, फूड स्टॉल आणि सेल्फी पॉईंट या चैत्रोत्सवाचे खास आकर्षण असणार आहेत. याशिवाय येथे लकी ड्रॉ द्वारे खरेदीवर रोज मानाची पैठणी तसेच अन्य भरपूर बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. येथे पे अँड पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठाणे चैत्रोत्सवाच्या अधिक माहितीसाठी अमित गोडबोले ९८९२०९३१८५ यांच्याशी संपर्क साधावा.