महाविकास आघाडीचे इंजिन भरकटले – उप मुख्यमंत्री फडणवीस

बदलापूर: राज्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीच्या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदीरुपी भक्कम इंजिन जोडल्याने देशभरात विकास झाल्याचे दिसते, मात्र योग्य चालक नसल्याने महाविकास आघाडीचे इंजिन भरकटले असून दिशाहीन झाल्याचा टोला उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

भिवंडी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार आणि मंत्री कपिल पाटील आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराचा मुहूर्त उप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार किसन कथोरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन आणि कार्यकर्ता मेळाव्याचे बदलापुरात आयोजन करण्यात आले होते.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासरुपी कामाची गुढी दिवसेंदिवस उंचावत आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीनंतर देशात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 10 वर्षांत विकास कामे करताना सर्वसामान्यांना लागणाऱ्या घर, वीज, स्वच्छ पाणी, रस्ते, आरोग्य या सुविधा देण्याला प्राधान्य दिले गेले आहे. सध्या भारत देश सर्वात उत्तम अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून मान्यता मिळाली आहे. आगामी काळात रेल्वेच्या सेवेची काळजी करू नका. रेल्वेतील भरीव सुधारणा करण्याबरोबरच बदलापूरकरांना मेट्रोची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली. यावेळी अबकी बार 400 पार हा नारा केवळ खुर्चीत बसण्यासाठी नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनुसार कारभार करून परिवर्तन घडवण्याचे काम केले जाणार आहे. येणारी निवडणूक भारताला मजबूत करणारी निवडणूक असल्याने महायुतीच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाश्यांचे हाल होत असून त्याकडे लक्ष देण्याची विनंती आमदार कथोरे यांनी केली. खासदार डॉ. शिंदे यांनी कल्याण मतदार संघात रेल्वेबाबत केलेल्या कामांचा तर खासदार पाटील यांनी बदलापूर, टिटवाळा रेल्वे स्थानकात केलेल्या कामांचा आढावा घेतला.

मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार कुमार आयलानी, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शहरप्रमुख वामन म्हात्रे, माजी नगराध्यक्ष राम पातकर, राजेंद्र घोरपडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले, शहराध्यक्ष प्रभाकर पाटील, आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. शहराध्यक्ष शरद तेली यांनी सूत्रसंचालन केले, माजी शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी आभार मानले.