टीजेएसबी बँकेने राखली भक्कम आर्थिक परंपरा

ठाणे : टीजेएसबी सहकारी बॅंकेची नवसंकल्पनेतून वृद्धींगतेची वाटचाल सुरू असून यंदाही सर्वोच्च असा २१६ कोटी निव्वळ नफा कमावला आहे. दरवर्षीप्रमाणे लेखापरिक्षित आर्थिक निकाल १० एप्रिल रोजी घोषित करण्याची परंपरा राखत टीजेएसबी बँकेने यावर्षी देखील आर्थिक वर्ष २३-२४ चा लेखापरिक्षित आर्थिक लेखाजोखा हॉटेल सत्कार ग्राँडे, ठाणे येथे बुधवारी पत्रकार परिषदेत जाहिर केला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी तसेच, सर्व संचालक, व्यवस्थापकीय सदस्य व बँकेचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी अनेक बाबींचा ठळकपणे उल्लेख केला. गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण रु. १३,७४३ कोटी ठेवी होत्या. त्या आता रु. १४,५८८ कोटी झाल्या आहेत. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.१५ % वृद्धी झाली आहे. तर कर्ज वितरण रु. ७,२११ कोटी वरून रु. ७,८७५ कोटी वर स्थिरावले. पुंजी पर्याप्तता ही १७.५७ टक्के राहिली. हे सर्व करत असताना बँकेचा एकूण व्यवसाय २० हजार ९५४ कोटीवरून २२ हजार ४६३ कोटीवर पोहोचला आहे. बँकेचा स्वनिधी १५ ४९ कोटी वरुन १७१९ कोटी इतका झाला आहे. ढोबळ अनुत्पादित कर्ज प्रमाण घसरून ३.६६% राहिले तर, निव्वळ अनुत्पादित कर्ज गेल्या वर्षीप्रमाणे शुन्य टक्के राहिले आहे.

शरद गांगल पुढे म्हणाले, बँकेने गेल्या आर्थिक वर्षात तीन नवीन शाखा सुरु केल्या, त्यात कर्जत (रायगड), वाळुंज (छत्रपती संभाजीनगर) या नेहमीच्या पद्धतीने उघडल्या. तर, पर्वरी (गोवा) येथे रिझर्व बँकेच्या नव्या “ऑटोमॅटिक रूट” या धोरणानुसार ही शाखा सुरु झाली आहे. नागपूर येथे दूरस्थ एटीएम सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सुरु असलेल्या एप्रिल २०२४ या महिन्यात पुणे जिल्ह्यातील मोशी व बारामती येथे बँकेच्या नवीन शाखा सुरु होत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, आणखी दोन शाखा वर्षभरात कार्यान्वित होतील, असे अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितले. बँकेच्या ५३ व्या वर्धापन दिनी TJSB SANDESH ही ध्वनीसहित क्युआर कोड प्रणाली व्यावसायिकांसाठी सुरु करण्यात आली. तर गोवा येथे तीन एटीपीएम सुविधा, म्हणजेच कधीही चोवीस तास धनादेश, क्लिअरींग सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गोवा सरकारची विद्युत देयक भरण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरली आहे. मुंबईत बेस्टच्या वीज ग्राहकांना त्यांच्या विद्युत देयकांचे धनादेश जमा करण्यासाठी ही सुविधा दिलेली आहे.अपारंपारिक मार्गातून व्यवसाय वृद्धी करताना टीजेएसबी बँक कायमच “भरोसे का बँक, भविष्य का बँक ” म्हणून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरून यापुढेही बँक अशीच प्रगती करेल. असे अध्यक्ष गांगल यांनी शेवटी सांगितले.

टीजेएसबी बँकेला तीन पुरस्कार

टीजेएसबी बँकेला इंडियन बँक असोसिएशनकडून एकूण तीन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. बँकेने पुरस्कारांचा त्रिवेणी संगम साधला आहे. बँकेला बेस्ट बँक सेल्स, पेमेंट अँड एंगेजमेंट तर दुसरा बेस्ट टेक टॅलेंट अँड ऑर्गनायझेशन तर तिसरा बेस्ट टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर असे एकूण तीन प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले आहेत.