ठाणेवैभव करंडक स्पर्धा म्हणजे ठाण्याची टाइम्स शिल्ड

रणजीपटू सुलक्षण कुलकर्णी यांचे प्रतिपादन

ठाणे : टाइम्स शिल्ड क्रिकेट हा मुंबईच्या क्रिकेटचा आत्मा आहे. तर ठाणेवैभव करंडक स्पर्धा ही ठाण्याची टाइम्स शिल्ड आहे. या स्पर्धेतून भविष्यात मुंबईला गुणवान क्रिकेटपटू उपलब्ध होतील, असा विश्वास प्रमुख पाहुणे आणि रणजीपटू सुलक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

दैनिक ठाणेवैभव आणि स्पोर्टिंग क्लब कमिटी, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणेवैभव क्रिकेट करंडक स्पर्धेच्या बक्षीस समारंभात ते बोलत होते. सलग ४८ वर्षे यशस्वीपणे स्पर्धा आयोजित करून जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देत अनेक खेळाडू तयार करण्याचे काम ठाणेवैभवने केल्याचे श्री.कुलकर्णी यांनी सांगितले.

स्पर्धेत अ गटात डीटीडीसी संघ विजेता ठरला तर ब गटात ठाणे महापालिका संघ आणि क गटात ग्रुप सॅटेलाईट संघ अजिंक्य ठरला. कै. प्रभाकर गुजराथी स्मृती सर्वोत्तम शिस्तबद्ध संघ पुरस्कार (वर्ष ५ वे) ग्रुप सॅटलाईट संघाला देण्यात आला. त्याचबरोबर वैयक्तिक स्तरावरील बक्षिसेही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य अभय हडप, ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, मिनल पालांडे, उपआयुक्त (क्रीडा), माजी नगरसेवक विकास रेपाळे, स्पर्धा समन्वयक प्रल्हाद नाखवा, व्यवस्थापकिय संपादक निखिल बल्लाळ व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. संतोष राणे यांनी सुत्रसंचालन केले.

शेवटच्या दिवशी शुक्रवारी झालेल्या ‘अ’गटातील एकतर्फी अंतिम लढतीत रूट मोबाईलची ९२ धावसंख्या डी. टी. डी. सी. ने तब्बल आठ गडी राखून ओलांडत सलग दुसऱ्या वर्षी ओंकार घुलेच्या नेतृत्वाखाली अजिंक्यपद पटकावले.विजेत्या संघातर्फे अजीत यादवने १२ धावांत सहा विकेट्स घेतल्या तर सत्यलक्ष जैनने नाबाद ४९ धावांची खेळी केली.