आठवडाभरात लसणाच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

नवी मुंबई : मागील आठवड्यात वाशीतील एपीएमसी बाजारात लसणाच्या दरात घसरण झाली होती. बाजारात आता आवक कमी होत असल्याने लसणाच्या दराने ३० ते ४० रुपयांनी उसळी घेतली आहे. त्यामुळे ऐन जत्रा आणि लग्न सराईत लसणाचे दर वाढत चालल्याने फोडणी महाग होत चालली आहे.

डिसेंबरपासून लसणाची आवक घटल्याने घाऊक बाजारात लसणाचे दर ३५० ते किरकोळ बाजारात ४८०पर्यंत गेले होते. मात्र जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नवीन लसणाचे उत्पादन वाढल्याने मार्च महिन्यात लसणाचे दर खाली उतरले होते. बाजारात नवीन लसूण येत असल्याने दरात घसरण होत चालली होती. आता साठवणूकदारांकडून लसणाची साठवणूक करण्यास सुरुवात झाली आहे. लसणाची साठवण केल्याने तो जुना होऊन त्याचा दर्जा अधिक चांगला होता. त्यामुळे या मौसमांत लसूण साठवण्यावर भर दिला जातो. परिणामी बाजारात आवक घटत चालली आहे.

शुक्रवारी वाशीतील एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात लसणाच्या १२ गाड्यातून फक्त २०९८ गोणी लसणाची आवक झाली. त्यामुळे दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात घाऊक बाजारात उटी लसूण प्रतिकिलो ८० ते १४०, तर देशी लसूण ५० ते १२० तर शुक्रवारी उटी लसूण १२० ते १६० व देशी लसूण ९० ते १३० दराने विक्री होत आहे. किरकोळ बाजारात लसूण १४० ते २०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.

बाजारात सध्या मध्यप्रदेशमधील लसणाची आवक होत आहे. लसणाची साठवणूक काही काळ वाढल्यास दर अधिक वाढण्याची शक्यता येथील व्यापारी विकास शिंदे आणि नवराज सणस यांनी व्यक्त केली.