अखेर यशोधन नगर बस थांबा पूर्ववत

ठाणे : १५ दिवसांपूर्वी एका टेम्पोच्या धडकेने यशोधन नगर बस थांबा उखडला होता. ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना उभे राहून बसची वाट पाहावी लागत होती. स्वराज्य सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्यानंतर नव्याने थांबा उभारण्यात आला.

वाहनाच्या धडकेत हा थांबा उद्ध्वस्त झाल्यानंतर ठाणेवैभवमध्ये हे वृत्त प्रकाशित झाले होते. येथील प्रवासी नागरिकांना उन्हात उभे राहून बसची वाट पाहावी लागत होती. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला यांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत स्वराज्य सामाजिक संस्थेतर्फे ठाणे परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. हा बस थांबा लवकरात लवकर बसविण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांमार्फत याप्रसंगी देण्यात आले होते.

अखेर या ठिकाणी बस थांबा बसविण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून स्थानिक प्रवासी नागरिकांनी संस्थेचे आणि परिवहन प्रशासनाचे आभार मानले.