घोटभर पाण्यासाठी करावी लागते दीड किलो मीटर पायपीट
नवी मुंबई : जल संपन्न महापालिका अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील पावणे येथील आदिवासी बारमाही दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. मागील तीन-चार वर्षापासून येथील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी आजही दीड किलोमिटर पायपीट करून पाणी भरावे लागते किंवा टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
स्वतःचे मालकी धरण असलेली महापालिका शहरात ४५० एमएलडी पाणीपुरवठा करते तर औद्योगिक वसाहतीत आणि शहरी भागात एमआयडीसी ८० एमएलडी पाणीपुरवठा करते. मात्र एवढा पाणी पुरवठा असून देखील शहरातील काही भागात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती जाणवते. अशीच अवस्था पावणे एमआयडीसीतील आदिवासी पाड्यात आहे. पावणे एमआयडीसी परिसरातील आदिवासींना नवी मुंबई महानगर पालिकेने वाल्मीकी आवास योजनेतून मनपाने घरे बांधून दिली आहेत. मात्र या पाड्याला आजही पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. या ठिकाणी पाण्याची टाकी आहे व प्रत्येकाच्या घराघरात नळजोडणीही देण्यात आलेली आहे, पण टाकीत पाणीच नसल्याने जल वाहिन्यांना गंज पकडला आहे. जुन्या वारली पाड्यातून जेव्हा या आदिवासींना नवीन घरांत स्थलांतरीत करण्यात आले, त्यावेळी काही दिवस टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता, तो ही घरगुती वापरासाठी. मात्र कालांतराने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था बंद पडली. त्यामुळे पिण्याचे पाणी लागल्यास जुन्या वारली पाड्यातून आणावे लागते होते. हा क्रम काही दिवसांचा नसून गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. आजही पिण्याच्या पाण्यासाठी जुन्या वारली पाड्यावर नाहीतर दीड किलोमीटर असलेल्या शालिमार कंपनीजवळ फुटलेल्या जलवाहिनीचा किंवा टँकरचा आधार या आदिवासींना घ्यावा लागत आहे. येथील पाण्याची टंचाई इतकी आहे की लहान मुलांना देखील उन्हाचे चटके सोसत पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
येथील आदिवासींना भेडसावत असलेल्या पाणी समस्येबाबत वारंवार प्रशासनासोबत वारली पाडा घर बचाव संघर्ष कृती समितीकडून पाठपुरावा करण्यात आला. मात्र पदरी केवळ खोटी आश्वासने पडली आहेत. त्यामुळे आजही येथील रहिवाशांना आपल्या बायका पोरांसह पाण्यासाठी पायपीट करावी लागते, अशी प्रतिक्रिया वारली पाडा घर बचाव समिती अध्यक्ष कृष्णा वड यांनी दिली.
पावणे एमआयडीसी,वारली पाडा येथील पाणी समस्येबाबत मनपा अभियंत्यांमार्फत पाहणी केली जाईल. तसेच एमआयडीसीसोबत देखील समन्वय साधून येथील रहिवाशांना पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी कार्यवाही केली जाईल, असे अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी सांगितले.