ठाण्यात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योगाचे मिळणार उपचार

आयुष हॉस्पिटलसाठी १५ कोटी मंजूर

ठाणे : सिव्हील रुग्णालय मूळ ठिकाणी स्थलांतरीत झाल्यानंतर मनोरुग्णालयाच्या जागेत आयुष रुग्णालय बांधण्यात येणार असून त्याकरिता १५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

रुग्णालयाची संरचना, मनुष्यबळ, साधन सामुग्री, औषधी व निवासस्थाने आदींचा सविस्तर कृती आराखडा बनवण्यात आला आहे. ५० खाटा असलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयात योगा, प्रतिक्षालय, अभिलेख, प्रक्रिया, मुख्य वैद्य कक्ष आयुर्वेद कक्ष, स्वच्छतागृह, होमिओपॅथी कक्ष, नॅचरोपॅथी, युनानी, प्रयोगशाळा, मड बाथ नॅचेरोपॅथी, पंचकर्म सेंटर, शिरोधारा, वमन-बस्ती आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. अ‍ॅलोपॅथी उपचाराइतकेच आयुर्वेदिक उपचारांवर विश्वास ठेवणा-या रुग्णांसाठी मनोरुग्णालय परिसरात ५० खाटांचे आयुष रूग्णालय उभारण्यात येणार आहे. आयुर्वेदिक होमियोपॅथी, युनानी या सारख्या उपचार पद्धतीने रुग्णांवर उपचार होतील. त्यामुळे सर्व उपचार सर्वसामान्य रुग्णांना घेणे परवडणार आहे.

आयुर्वेदिक उपचार घेताना काहीसा विलंब लागत असला तरी, उपचारानंतर रुग्णाला मोठा आराम मिळतो. त्यामुळे दीर्घ आजार असणारे अनेक रुग्णांचा आयुर्वेदिक उपचारांकडेच घेण्याकडे कल असतो. काही वेळा आयुर्वेदिक खर्च खिशाला परवडणारा नसतो. परंतु, आता ठाण्यात आयुष रुग्णालय उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आयुष अभियानाच्या अंतर्गत आयुष रुग्णालय बांधले जाणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामांचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो. अ‍ॅलोपॅथी उपचारात रुग्णाला झटपट आराम मिळत असला तरी आयुर्वेद, होमियोपॅथी, युनानीसारख्या उपचारांनी रुग्णांना आराम मिळतो. अशा उपचारांनी रुग्ण बरा होण्यासाठी काहीसा विलंब लागतो. परंत, आयुष रुग्णालयात उपचार घेणा-यांची संख्या बरीच असते, असे डॉ. कैलास पवार (ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक) यांनी सांगितले.