खैरणे एमआयडीसीत भीषण आग; चार कंपन्या जळून खाक

अन्य चार कंपन्यांना झळ

नवी मुंबई : नवी मुंबईच्या खैरणे एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीला मंगळवार २ एप्रिल रोजी भीषण आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. त्यानंतर ही आग पसरल्याने या आगीत एकूण चार कंपन्या जळून खाक झाल्या, इतर चार कंपन्यांना त्याची झळ बसली.

नवी मुंबईच्या खैरणे एमआयडीसीतील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल, भुखंड क्रमांक ए ७७३ या रासायनिक कंपनीला मंगळवारी सकाळी दहा वाजता आग लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत आजूबाजूच्या चार कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. कंपनीला आग लागताच सर्व कामगार बाहेर पडले तर पोलिसांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजुच्या सर्व कंपन्यांमधील कामगारांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी व नवी मुंबई महानगर पालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. आगीची तीव्रता अधिक असल्याने अग्निशमनच्या जवळपास २५ ते ३० गाड्या लागल्या. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अधिक माहिती संपूर्ण आग विझवल्यांनरच स्पष्ट होईल अशी माहिती तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली आहे.