ठाणे लोकसभा उमेदवाराची निशाणी धनुष्यबाणच असणार – केसरकर

नवी मुंबई : महायुतीच्या जागावाटपात ठाणे लोकसभेची जागा कुणाच्या पारड्यात पडणार याविषयी महायुतीतील शिवसेना-भाजप या दोन पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. असे असताना ठाणे लोकसभा निवडणुकीत १०० टक्के धनुष्यबाणाचाच उमेदवार असणार, असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार १ एप्रिल रोजी ऐरोलीत शिवसेना पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी आश्र्वासित केले. यावेळी शिवसेना नेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विजय चौगुले, किशोर पाटकर, शिवराम पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर यंदा भाजपने दावा सांगितला असून येथून कुणाला रिंगणात उतरवायचे यासाठी वेगवेगळ्या नावांची पक्षाकडून चाचपणी देखील केली जात असून त्यात माजी खासदार संजीव नाईक यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे अजूनपर्यंत महायुतीकडून ठाण्याचा उमेदवार घोषित करण्यात आला नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघात १९९९ पासून शिवसेना जिंकत आली आहे. मात्र या मतदारसंघात सध्या भाजपचे तीन आमदार असून गीता जैन या अपक्ष आमदार भाजपच्या गोटातील मानल्या जातात. त्यामुळे भाजप या मतदार संघावर आपला दावा सांगत आहे. मात्र भाजपला हा मतदारसंघ सोडण्यात आणि विशेषतः संजीव नाईक यांना उमेदवारी देण्यास स्थानिक सेना नेत्यांचा देखील विरोध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ठाण्याच्या उमेदवारीवरून अजूनही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात खलबते सुरू आहेत. अशा परिस्थितीत दीपक केसरकर यांनी ठाण्याच्या उमेदवारीबाबत केलेल्या दाव्यावरून सेना गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.