महायुती म्हणून लढताना काही जागांवर तह करावाच लागेल

प्रताप सरनाईक यांचे संकेत

ठाणे: लोकसभेच्या ठाणे, नाशिकसह काही जागांवरून महायुतीचे जागावाटप अडले आहे. जागावाटप काही व्यापार किंवा देवाणघेवाण नाही, हा सर्वांचा हक्क आहे, असे स्पष्ट करून शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांनी, आम्ही १८ जागांवर आग्रही असलो तरी महायुती म्हणुन लढायचे असल्यामुळे काही जागांवर तह करावाच लागेल. असे संकेत दिले.

आ. सरनाईक यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळेल म्हणुन सर्वजण महायुतीत आले. मुळात २२ जागांवर अधिकार होता परंतु अजित पवार महायुतीत सामील झाल्याने एनसीपीला चार जागा देण्याचे ठरले. राज्याचे मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत. त्यामुळे १८ जागांसाठी आग्रही असून १९९६ पासुन दिघे साहेबांच्या नेतृत्वात ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचे नाक आहे. आमच्या या भावना शिंदेना माहिती आहेत. ते योग्य तोडगा काढतील. यावेळी अबकी बार ४०० पार एवढेच लक्ष्य आहे. तेव्हा याच आठवड्यात उर्वरीत जागा जाहीर केल्या जातील. निवडणूकीत जागावाटपांवरुन रस्सीखेच होतच असते. पण महायुती म्हणुन लढायचे असल्यामुळे काही जागांवर तह करावाच लागेल, असेही आ. सरनाईक यांनी स्पष्ट केले.