स्थानिकांनी विचारला जाब
भाईंदर : उत्तन धावगी परिसरातील रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा देताच महापालिका प्रशासनाला जाग आली. अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर सह उपायुक्त कल्पिता पिंपळे व इतर अधिकारी तसेच माजी आ. नरेंद्र मेहता यांनी घनकचरा केंद्रास भेट दिली. यावेळी स्थानिक रहिवाशांनी पालिका अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून सदर घनकचरा केंद्र अधिकृत आहे की अनधिकृत? याबाबत जाब विचारला.
मीरा-भाईंदरमधील दैनंदिन सुमारे ४०० टन जमा होणारा घनकचरा उत्तन धावगी डोंगराच्या घनकचरा केंद्रात साठविण्यात येतो. मागील अनेक वर्षांपासून साठविलेल्या हजारो टन घनकचऱ्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात येत असल्याचे पालिका अधिकारी सांगत असले तरी हजारो टन घनकचरा निर्मूलनाचा प्रश्न कायम आहे. सदर घनकचरा केंद्र हटविण्याची मागणी मागील १५ वर्षांपासून होत असूनही पालिका प्रशासनाकडून आश्वासनाच्या पलिकडे ठोस उपाययोजना होत नाही. तीव्र उन्हाच्या फटक्याने साठलेल्या घनकचऱ्याला वारंवार आग लागून परिसरात धुराचे प्रचंड साम्राज्य पसरते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना जीव नकोसा होतो.मागील आग दुर्घटनेनंतर पुन्हा आग लागल्याने स्थानिक लोकप्रतिनिधीसह धर्मगुरू फादर ऑस्कर मेंडोंसा यांनी घटनास्थळी भेट देवून कचरा केंद्र बाबत त्वरित उपाययोजना न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जाग आलेल्या पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून रहिवाशांना समजाविण्याचा प्रयत्न केला.
मागील वर्षभरापासून या कचऱ्यावर प्रक्रिया सुरू आहे. ठेकेदारामार्फत ही प्रक्रिया अनेक ठिकाणी करण्यास सांगितले जाईल, असे उपायुक्त कल्पिता पिंपळे यांनी म्हटले आहे.