महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची केली असून अद्याप दोन्ही पक्षांत चर्चा सुरूच आहेत. शिवसेनेकडे उमेदवारांचे अनेक पर्याय असले तरी नाईलाजास्तव वेळ आलीच तर भाजपातून उमेदवार आयात करण्याचा पर्यायही शिंदे गटाकडे आहे. मात्र यापैकी काय होईल, हा सस्पेन्स लवकरच संपणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपनेही दावा केला असून दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरूच आहे. ही जागा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मुख्यमंत्र्यांचे ठाणे आहे या मुद्द्यावर शिंदे गट चिवटपणे लढा देत आहे. या मतदारसंघात उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गटात आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांची नावे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातूनही डॉ.अमोल गीते यांचे नाव पुढे येत असून अनेक वैद्यकीय तज्ञांनी सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ.गीते यांच्यासारख्या सामाजिक संवेदना जपणाऱ्या व्यक्तीला संधी दिल्यास या मतदारसंघात नवा पायंडा पडू शकतो, अशी मते या क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.
शिवसेनेकडे अनेक पर्याय असले तरी भाजपा मात्र ही जागा सोडण्यास तयार नाही. भाजपात या जागेसाठी माजी खासदार संजीव नाईक यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र शिवसेनेतून या नावाला मोठा विरोध निर्माण होऊ शकतो. अशावेळी विद्यमान आमदार संजय केळकर हे नाव भाजपाचा हुकुमी एक्का म्हणून पुढे येऊ शकते. सुशिक्षित, सुसंस्कृत, जनतेत वावरणारा नेता आणि अवघ्या ठाणे जिल्ह्यात संपर्क असल्याने ऐनवेळी श्री.केळकर यांचेही नाव श्रेष्ठींकडून पुढे येऊ शकते.
एकूणच दोन्ही पक्षांकडून ठाण्यावर जोरदार दावेदारी केली जात आहे. मात्र ठाण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार संजीव नाईक यांना शुभेच्छा दिल्याने उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. शिवसेना या जागेसाठी आग्रही असताना नाईकांना शुभेच्छा देणारे छायाचित्र शिंदे गटासाठी तिसरा पर्याय ठरणार की काय, असा प्रश्न सध्या चर्चेला आहे. श्री.नाईक यांना धनुष्यबाण घेऊन लढतीत उतरवल्यास रस्सीखेच संपुष्टात येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.