घोटाळा झालेल्या नालेसफाईची कोट्यवधींची देयके अदा?

तत्कालीन आयुक्त तसेच लेखा विभागाची परवानगी नसताना कार्यवाही

ठाणे: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागताच ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची घोटाळ्यातील कामांच्या बिलांची मंजुरी काढून ठेकेदारांना बिल अदा करण्याची लगबग सुरू झाली आहे. यात नालेसफाईच्या घोटाळ्यात अडकलेल्या प्रकरणांचाही समावेश आहे.

२०२२-२३ या वर्षात नालेसफाई कामांचे कार्यादेश नसतानाही ठेकेदारांनी बेकायदेशीररित्या केवळ दिखाव्यासाठी नालेसफाईची काही ठिकाणी काम करून करोडो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी उघडकीस आणला. त्यानंतर तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी यासंबंधित केलेल्या कामांची बिले न काढण्याचे आदेश दिले होते. पण आयुक्त अभिजीत बांगर यांची बदली होताच महानगरपालिकेच्या घनकचरा व लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून कार्यादेश नसलेल्या कामांची बिल काढण्याचा प्रताप घडून आणला आहे. महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारी नालेसफाई ही केवळ दिखाव्‍यापुरती असून प्रत्यक्षात नालेसफाईच्या नावावर फक्त हात सफाई केली जाते असा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे. ही बाब वारंवार नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेला निदर्शनास आणून देण्यात आली आहे. पण तरीही महानगरपालिकेचे अधिकारी नालेसफाईच्या आड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार घडवून करोडो रुपयांची देयके लाटण्याचा खेळ वर्षानुवर्ष करत आले आहेत.

नालेसफाईच्या कामात पारदर्शकता यावी, यासाठी तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या होत्या. गेल्या वर्षाची नालेसफाई काही प्रमाणात पारदर्शक पद्धतीने करण्यात आली होती, पण २०२२-२३ यावर्षी झालेल्या नालेसफाईत मोठा घोटाळा झाला असून सुद्धा महापालिकेचे अधिकारी आचारसंहितेचा फायदा घेऊन संबंधित कामांचे देयक अदा करण्यात व्यस्त आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्या नालेसफाईचे काम पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी, यासाठी उपाययोजना करण्याचे काम महानगरपालिकेकडून अपेक्षित असताना महानगरपालिकेचे अधिकारी संगनमत करून घोटाळे झालेल्या कामाची देयके अदा करत आहेत. नव्या आयुक्तांनी याप्रश्नी वेळीच लक्ष देऊन चौकशी करावी, अशी मागणी महिंद्रकर यांनी केली आहे.