शिंदे-फडणवीस यांच्यात ठाण्याच्या जागेसाठी ‘टग ऑफ वॉर’

ठाणे: ठाणे लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असून दोन्ही पक्ष या मतदारसंघावर दावा करत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी २६ वर्षापूर्वी भाजपाच्या ताब्यात असलेला ठाणे लोकसभा मतदार संघ मिळवला होता. तेव्हापासून या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी होत आले आहेत. शिवसेना दुभंगल्यानंतर या मतदार संघाचे खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कायम राहिले, त्यामुळे भाजपाने या मतदार संघावर दावा सुरु केला. या मतदार संघात भाजपचे तीन आमदार आहेत तर एका अपक्ष आमदाराचा त्यांना पाठिंबा आहे. दुसरीकडे शिवसेनेचे दोन आमदार या मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात भाजपाची ताकद असल्याचा मुद्दा पुढे करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मतदार संघावर भाजपाचा दावा करत आहेत. या जागेसाठी ते प्रचंड आक्रमक असून कुठल्याही परिस्थितीमध्ये या मतदार संघातून भाजपाचा उमेदवार रिंगणात उतरवणार असा निश्चय त्यांनी केला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मतदारसंघ म्हणजे होम ग्राउंडच आहे. त्यांचा कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ याच लोकसभा मतदार संघात मोडत आहे. कै. दिघे यांनी हा मतदार संघ मिळवला आहे. हा मतदारसंघ भाजपाला सोडला तर शिवसैनिकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, त्यामुळे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी देखिल ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. हा मतदारसंघ भाजपाला सोडणे परवडण्यासारखे नाही. त्याचा विपरीत परिणाम पक्षावर होऊन विरोधी पक्षाला आयते कोलित मिळेल. या भीतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे देखिल या जागेवर ठाम आहेत त्यामुळेच ठाण्याच्या उमेदवाराची घोषणा शिंदे गटाने केली नाही.

भाजपातर्फे माजी खासदार संजीव नाईक, विनय सहस्त्रबुद्धे, संजय केळकर आणि संदिप लेले हे इच्छुक आहेत तर शिवसेनेचे माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के हे रिंगणात उतरण्यासाठी तयार आहेत.

या मतदारसंघात खा. राजन विचारे यांनी सात लाख ४८ हजार इतकी मते मिळवून राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचा तब्बल पावणे चार लाख मतांनी पराभव केला होता. त्यामुळे शिवसेना ही जागा सोडण्यासाठी तयार नाही. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अजून एक महिना बाकी आहे, त्यामुळे या जागेचा तिढा लवकर सुटण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.