हॉटेलबाहेर थांबलेला हॉटेल कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांवर हल्ला

हल्ल्यात हॉटेल कर्मचारी ठार, हल्लेखोर फरार

नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी जुहुगावमधील हॉटेल किनारासमोर २८ मार्च रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करून बसची वाट पाहत असलेले हॉटेल कर्मचाऱ्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली असून हल्ल्यात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर सफाई कामगार जखमी झाला आहे.

मुकेश कुमार उर्फ मनकु यादव (२६) असे मृत पावलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. जखमी सफाई कर्मचाऱ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हॉटेलचे काम उरकून पहाटे पाच वाजता मुकेश कुमार उर्फ मनकु यादव बसची वाट पाहत होता. त्याच्या हातात एक पिशवी होती आणि त्यात काही खाण्याच्या वस्तू व बॉटल होत्या. त्याला एकटे पाहून त्याच्या हातातील पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न या हल्लेखोरांकडून करण्यात आला.पिशवी देण्यास नकार दिला म्हणून हल्लेखोरांनी यादववर धारदार शस्त्राने हल्ला केला. यादव याच्यावर हल्ला झाल्याचे पाहताच हॉटेलमधील सफाई कामगार त्यास वाचवण्यास पुढे आला. त्या सफाई कामगारावर देखील वार करण्यात आले. त्यात तो जखमी झाला आहे. या हल्ल्यात हॉटेल कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सफाई कामगार जखमी झाला आहे. यातील हल्लेखोर फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.

या प्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भट्टे यांनी दिली आहे.