शहापुरात एकाच रात्री फोडली १० दुकाने

चोरटे सीसीटीव्हीत कैद

शहापूर : शहापूर तालुक्यात चोरांचे प्रस्थ वाढत चालले असल्याच्या घटना घडत असून काल मध्यरात्री 2 ते 3 च्या सुमारास शहापूर येथील 8 ते 10 दुकानें चोरट्यांनी फोडून यामधील रोख रक्कम व सामान चोरून पोबारा केला. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

शहापूर बाजारपेठेतील व चेरापोली हद्दीतील आठ ते दहा दुकानांचे शटर वाकवून तीन चोरांनी आत प्रवेश करत काही दुकानातील रोख रक्कम लंपास केली. यामध्ये रिद्धीनाथबाबा नगर येथील दिनकर किराणा स्टोअर्स, पटेल मार्ट तसेच कस्तुरी कॉम्प्लेक्स येथील वाईन शॉप, मेडिकल स्टोअर्स यांचा समावेश आहे. चोरीची घटना सीसी टीव्हीमध्ये कैद झाली असून तीन चोरटे त्यामध्ये स्पष्ट दिसून येत आहेत.

दरम्यान या चोरट्यांना कायद्याची भीती वाटत नसल्याने असे प्रकार वारंवार घडत असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगून चिंता व्यक्त केली.