भाजपाचा ठाकरे पॅटर्न; दिल्लीत वाटाघाटी यशस्वी

नवी दिल्ली: उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज्यात हिंदुत्वाची रिकामी झालेली स्पेस राज ठाकरे यांच्यामुळे भरून निघणार असल्याने दिल्लीत अमित शाह आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेल्या वाटाघाटी यशस्वी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या टप्प्यात भाजपाला महाराष्ट्रात ठाकरे नावाची जोड मिळाली असून मिशन ४५ सफल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १४ तास दिल्लीत ताटकळत काढल्यानंतर मंगळवारी दुपारी साडेबारानंतर अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंबरोबर अमित ठाकरेही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली.

राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरुद्ध घेतलेली भूमिका दूर लोटून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला होता. त्याचवेळी गेल्या काही महिन्यांत राज ठाकरे यांनी उचललेल्या काही मुद्द्यांना राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आगामी काळात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला मनसेचे इंजिन जोडले जाणार असे बोलले जात होते. मात्र सत्तेत राष्ट्रवादी अजित पवार गट येऊन मिळाल्यानंतरही मनसेचे काही ठरतं नव्हते. ही प्रतिक्षा मंगळवारी संपली. राज ठाकरे यांनी आज दिल्ली अमित शाह यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे कळले नसले तरी दक्षिण मुंबई मतदारसंघासह आणखी एक जागा मनसेला मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

बाळा नांदगावकर यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना अमित शाहांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगून येत्या २-४ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे म्हणाले.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला जवळ केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला हिंदुत्वाची भूमिका ठामपणे घेता येत नाही, त्यामुळे हिंदुत्वाची एक स्पेस रिकामी झाली होती. ही स्पेस राज ठाकरे भरून काढतील, त्याचा फायदा महायुतीला मिळून ४५हून जास्त लोकसभेच्या जागा पदरी पडतील, असा विश्वास महायुतीच्या गोटात व्यक्त होत आहे.