* कडोंमपा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे प्रतिपादन
* ठाणेवैभव आणि युवान ग्रुप आयोजित महिला दिन पुरस्कार सोहळा ठरला संस्मरणीय
ठाणे: महिला दिनानिमित्त आपण व्यवसायिक यशस्वी महिलांचे कायम सत्कार करतो पण त्याचबरोबर या महिलांना यशस्वी करण्यात ज्यांचे मोलाचे सहकार्य आहे अशा गृहिणींचा देखील सत्कार व्हायला हवा, असे मत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी ठाणेवैभव आणि युवान ग्रुप यांनी आयोजित केलेल्या महिला गौरव सोहळ्यात व्यक्त केले.
कोणत्याही क्षेत्रात सर्वात महत्वाचे असते ते मॅन मॅनेजमेंट. महिला या अत्यंत उत्तम मॅन मॅनेजमेंट करू शकतात, त्यामुळे आधी जी क्षेत्रे महिलांसाठी नाहीत असे समजले जायचे त्याच क्षेत्रात त्या केवळ काम करत नसून त्यांनी त्यात यशाचे शिखरही गाठले आहे. ठाणेवैभव आणि युवान ग्रुपने अशा महिलांची निवड केली आणि त्यांचा गौरव केला, याबद्दल मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे, असे देखील त्या पुढे म्हणाल्या.
यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन थीम होती इनक्लूजन (सर्वसमावेशक) आणि इन्स्पायर (स्फूर्तिदायक). ठाणेवैभव ज्या 15 महिलांचे सत्कार करत आहे त्यांची यशोगाथा खरोखर स्फूर्ती देणारे आणि सर्व गुणांनी समावेशक आहेत. एखाद्या शहराची प्रतिमा तेथील उत्तुंग इमारतीने तयार होत असतेच मात्र ती समृद्ध होते त्या शहरात राहणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या लोकांमुळे. आज अशा वैभवशाली महिलांचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली याचा आम्हाला अभिमान आहे, असे मत ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी व्यक्त केले.
ठाणेवैभव या वर्षी 50 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ठाणेवैभवच्या वाटचालीत देखील महिलांचा सिंहाचा वाटा आहे. ठाणेवैभव कायम महिलांच्या सबलिकरण आणि सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत असतो. या अगोदर देखील वूमन ऑफ सब्स्टन्स, सुपर वूमन अशा विविध उपक्रमांतून वेगवेगळ्या क्षेत्रातील ठाणेकर महिलांना जोडलेले आहे आणि पुढेही यात काम करत राहू, असे मत ठाणेवैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी केले. ठाणेवैभवच्या एका हाकेवर आज या सर्व महिला आपल्या व्यस्त वेळापत्रक असून सुद्धा केवळ ठाणेवैभवच्या प्रेमापोटी इथे आल्या, याचे विशेष कौतुक वाटते असे देखील ते पुढे म्हणाले.