नालेसफाईच्या टेंडरकडे ठेकेदारांनी फिरवली पाठ

* दोन वर्षांची बिले रखडली
* सफाईच्या बजेटमध्ये कपात
* यंदा नाले तुंबण्याची भीती

ठाणे: गेल्या दोन वर्षांची नाले सफाईची बिले रखडली असताना यंदा नाले सफाईचे बजेटही कमी करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा ठेकेदारांनी या कामाच्या टेंडरकडे पाठ फिरवलेली आहे. ठाणे महापालिकेने राबवलेल्या निविदा प्रक्रियेत आतापर्यंत केवळ दोन निविदा सादर झाल्या आहेत.

पावसाळ्यात आपत्ती निर्माण होऊ नये यासाठी दरवर्षी कोट्यवधी खर्चून शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. मात्र, यंदा नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेला शून्य प्रतिसाद
मिळाल्याने पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलताना दिली. दरम्यान, २०२२-२३ या आर्थिक वर्षात नालेसफाईचे बिले मिळाली नसल्याने यंदा नालेसफाईचे काम करताना पैसे कुठून आणायचे असा प्रश्न ठेकेदारांना भेडसावत आहे.

दरवर्षी शहरातील नालेसफाईवर १० कोटी खर्च केले जातात. महापालिकेने यंदा नालेसफाईच्या बजेट ५ ते १० टक्के घट केली असून जीएसटीचा भार देखील कमी केल्याने या खेपेला नालेसफाईसाठी सात कोटींचे बजेट आहे. नाले सफाईची रक्कम कमी केल्याने ठेकेदार मंडळींकडून नाराजी व्यक्त होत असून परिणामी निविदा प्रक्रियेला अल्प प्रतिसाद लाभत असल्याचे घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभागांमध्ये ११९ किलोमीटर लांबीचे एकूण ३०६ नाले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामाकरिता २०२२-२०२३ या वर्षासाठी सुमारे १० कोटीच्या निविदा काढल्या होत्या. सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात महापालिका आयुक्तांनी काटकसरीचा संकल्प सोडला आहे. त्यातच नुकत्याच पार पडलेल्या सर्वकष स्वच्छता (डिप क्लिनिंग) मोहिमेत नाल्यांची स्वच्छता करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

शहरात नालेसफाई चांगल्या दर्जाची होण्याकडे महापालिकेचा कटाक्ष असला तरी ठेकेदारांकडून ‘हातसफाई केली जात असते. मागील वर्षी नालेसफाईची पोलखोल झाल्यानंतर समाधानकारक नालेसफाई न केल्याचा ठपका ठेवून ठेकेदाराला दंड ठोठावून काळ्या यादीत टाकले होते. यंदा ठेकेदारांच्या हातसफाईवर करडी नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.