मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार भूमिपूजन
ठाणे : ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या ९-९ मीटर सेवा रस्त्याचा ?समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करण्यात येणार आहे.
या सेवा रस्त्यांचा वापर फक्त रस्त्याजवळील दुकानदार व काही खाजगी गाड्या तसेच टेम्पो, ट्रक, ऑटो रिक्षा पार्किंगसाठी केला जातो. त्यामुळे स्थानिक वाहनचालक सेवा रस्त्याचा वापर न करता मुख्य रस्त्याचाच वापर करतात. तसेच सेवा रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारावरील पाच ते सहा फुट रुंद पदपथाचा उपयोग पादचाऱ्यांना होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करण्यात आल्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील बऱ्याच अंशी सुटणार आहे.
सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. सरनाईकांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून लवकरच या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार सरनाईक यांनी दिली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत मेट्रोचे काम सुरू असून या कामामुळे या भागात नागरिकांना प्रचंड वाहतुककोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये बऱ्याचदा खाजगी वाहनांसह फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि रुग्णवाहिकाही अडकून पडतात. आगीसारखी एखादी दुर्घटना घडल्यास अथवा रूग्णवाहिकेमध्ये अत्यवस्थ रूग्ण असल्यास सर्वसामान्य नागरिकांना जीव गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. घोडबंदर रोडहून इच्छितस्थळी जाण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने या रोडवरील वाहतुककोंडीमुळे कमीत-कमी अंतरासाठी अर्धा ते एक तासाचा कालावधी लागत आहे. याकरिता घोडबंदर रोडवरील जर दोन्ही बाजूच्या ९-९ मीटरचा सेवा रस्ता हा घोडबंदरच्या मुख्य रस्त्याला जोडल्यास व मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक-एक मीटरचा फुटपाथ केला तर पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना या फुटपाथ व रस्त्याचा वापर करता येईल. अतिरिक्त १६ मीटर सेवा रस्ता घोडबंदर रोडला जोडावा तसेच घोडबंदर रोडवर काही ठिकाणी वनखात्याची कुंपण भिंत भर रस्त्यात येत असल्यामुळे बाधीत होणारी जमीन लवकरात लवकर ताब्यात घेऊन रस्ता रूंदीकरण करण्यासाठी आमदार सरनाईक शासनाकडे पाठपुरावा करीत होते. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून घोडबंदर रोडवरील कापूरबावडीपासून फाऊंटन हॉटेलपर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ९-९ मीटरचा सेवा रस्ता मुख्य रस्त्यामध्ये घेतला जाणार आहे. त्यामुळे जनतेला वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.
या संदर्भातील निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याचे आमदार सरनाईक यांनी सांगितले.
एका बाजूला बोरीवली टनेल होत आहे तर दुसऱ्या बाजूला बाळकुम ते गायमुख खाडी किनारा रस्त्याच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. तसेच घोडबंदर रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असल्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.