२५० कामगारांचे साखळी उपोषण सुरू
ठाणे: ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीतील कामगारांनी कंपनीच्या गेटवरच साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. सुमारे २०० ते २५० कामगारांनी हे साखळी उपोषण सुरु केले असून गेली दोन वर्ष कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना मासिक वेतन न दिल्याने हे उपोषण सुरु करण्यात आले आहे.
सध्या सुपरमॅक्स कंपनी बंदच असून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा न करता ही कंपनी बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे यासंदर्भात प्रकरण न्यायायालयात देखील असल्याने अशा दोन्ही कात्रीत सर्वसामान्य कामगार सापडले आहेत.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात तब्बल ७० वर्ष जुनी सुपरमॅक्स ही कंपनी आहे. प्रामुख्याने या कंपनीत ब्लेड तयार करण्याचे काम करण्यात येत असून हजारो कामगार या कंपनीमध्ये काम करत होते. मात्र दोन वर्षांपूर्वी कंपनी व्यवस्थापनाने कंपनी चालवू शकत नसल्याचे कारण पुढे करत कंपनी बंद केली आहे. या संदर्भातील कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा व्यवस्थापनाकडून करण्यात आली नसल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे.
कंपनी बंद करत असल्याचे ज्यावेळी सांगण्यात आले त्यावेळी कामगारांचा पगार सुरु राहील असे आश्वासन आम्हाला देण्यात आले होते, अशी माहिती कामगारांनी दिली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून व्यवस्थापनाकडून पगारच मिळाला नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या संदर्भात गेल्या दोन वर्षात कामगारांच्या वतीने अनेकवेळा आंदोलनेही करण्यात आली आहेत.
दुसरीकडे कंपनीचा ताबा घेण्यासंदर्भात प्रकरण न्यायालयात देखील गेले असल्याचे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला विलंब लागत असल्याने आपला संसार कसा चालवायचा असा प्रश्न कामगारांना भेडसावत आहेत.
किमान आम्ही जेवढे काम केले आहे तेवढ्या महिन्याचा पगार तरी द्या, अशी मागणी कामगारांच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी आता कामगारांच्या वतीने कंपनीच्या गेटबाहेरच साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत दररोज आळीपाळीने कामगार साखळी उपोषण करणार असल्याचे कामगारांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.