* पाच वर्षात ७६० ठिकाणी गळती
* ठाण्यात कोट्यवधी लिटर पाण्याची नासाडी
भालचंद्र देव/ठाणे
‘स्मार्ट सिटी’च्या पंक्तीत बसलेल्या ठाणे शहरात गेल्या पाच वर्षांमध्ये ७६० ठिकाणी ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या जलवाहिन्या फुटल्या तर एकच जलवाहिनीला तेरा वेळा धक्का बसल्याची बाब उघडकीस आली असून कोट्यवधी लिटर पाणी वाया गेले आहे.
महापालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षात ७६० ठिकाणी विकासकामे, वाहनांचा धक्का आणि अन्य लहान-मोठ्या कारणांमुळे वाहिनींचे नुकसान झाले आहे आणि तब्बल १३ वेळा जलवाहिनी फुटून कोट्यवधी लिटर पाण्याची नासाडी झाली. अनेक वेळा अवजड वाहनांची धडक अथवा वजनाने जलवाहिन्या फुटत आहेत. सन २०२३ मध्ये २३५ वेळा जलवाहिनीला धक्का लागून पाणी वाया गेले होते.
सध्या ठाणे महापालिकेने शहरात विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, बागबगीचे, सिमेंट क्राँक्रिटचे चकाचक रस्ते, मास्टीक डांबर अशी कामे सुरु आहेत. परिणामी शहराला वेगळीच झळाळी मिळाली, परंतु, पाणी बचतीसाठी दुर्लक्ष होत आहे. मात्र सुजाण ठाणेकर महापालिका जलवाहिनीच्या सुरक्षेबद्दल उदासिन असल्याचा आरोप करत आहेत.
मात्र ही विकासकामे होताना जलवाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे. ब-याच ठिकाणच्या जलवाहिन्यांना धक्का लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या पाच वर्षात ७६० ठिकाणी लहान, मोठ्या जलवाहिनी फुटल्याची माहिती महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील आकडेवारीमुळे समोर आली आहे.
शहरात कुठे ना कुठे रस्ते खोदण्याचे काम सुरू असते. परंतु रस्त्याखालून गेलेल्या जलवाहिन्यांवर आघात होतात. त्यामुळे जलवाहिनी खराब किंवा फुटून होऊन पाण्याची नासाडी होत आहे. जलवाहिन्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने या घटना झाल्या असून, पाच वर्षात १३ वेळा जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पिण्याचे पाणी वाहून गेले आहे.
जेसीबीने रस्ता खणताना रस्त्याखालील जलवाहिनीचा अंदाज येत नाही. परिणामी, जलवाहिनीला धक्का लागतो. त्यामुळे रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर पाणी गळती होऊन रस्त्यावर पाणी जमा झालेले दिसते, असे ठाणे पूर्व येथे ब-याच वर्षांपासून राहणारे मनोहर चव्हाण यांनी सांगितले.
नागरी सुविधा आणि विकासकामे करताना अनेकदा जलवहिनीला धक्का लागतो किंवा वाहनांची धडक आणि रस्ता दबल्यामुळे जलवाहिनीचे नुकसान होते. मात्र जलवाहिनी खराब झाल्यावर तत्काळ दुरुस्ती केली जाते, असा दावा ठाणे महापालिकेच्या पाणी विभागाने केला आहे.