ठाणे : शहरात दररोज वातावरणात बदल होत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. हवामानात अचानक बदल घडत असून विषाणूजन्य आजाराचा फैलाव वाढत असल्याने ठाणेकरांमध्ये गालगुंडचा त्रास वाढू लागला आहे. या साथीच्या आजाराने ठाणेकर त्रस्त झाले असून दर तीन तासांनी मुखशुध्दी करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.
रात्रीचा गारवा आणि दुपारच्या वेळेत कडाक्याचा उष्मा असे विचित्र हवामान ठाणे शहरात बघायला मिळत आहे. त्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोळे येणे याच बरोबर गालगुंड आजाराने डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरीकांना गालगुंडचा त्रास जाणवू लागला आहे. या आजाराचे रुग्ण ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात अचानक वाढू लागले असल्याने जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहेत.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांनी गालगुंडचे अनेक रुग्ण हातळले असून येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश बोरुळकर यांनी दिली.
सुरुवातीला सर्दी, खोकला, ताप येतो. तसेच लाळ ग्रंथीला, विषाणूजन्य संसर्गाने सुज, व गालफूगी व गालदुखीचा त्रास होतो. साधारण आठवडाभर गालफुगीचा त्रास रुग्णांना जाणवतो. वेळीच जवळच्या वैद्यकीय तज्ज्ञाकडे जाऊन उपचार घेणे खूप गरजेचे आहे. या आजारात रुग्णाने किमान आठवडाभर घरीच, विलगीकरण करून आराम करावा.
अश्या रुग्णांनी मुख स्वच्छता करून समतोल आहार घ्यावा. मल्टीविटामिन म्हणजेच क जीवनसत्व फळे खावीत तसेच तापासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच औषध घेणे. लहान बालकांना वयाच्या १२ ते १४ महिन्यात एमएमआर लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे, अशा टिप्स जिल्हा रुग्णालयाचे बालरोग तज्ञ प्रकाश बोरुळकर यांनी दिल्या आहेत.
हा विषाणू खोकणे, शिंकणे किंवा बोलण्याव्दारे शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे तोंडातील लाळग्रंथी सुजतात. गालफुगी रुग्णांनी घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावणे आवश्यक आहे. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. गालफुगीचा त्रास लहान मुलांना अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाल फुगीची लक्षणे असणाऱ्या मुलाला शाळेत पाठवू नये, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केल्या आहेत.