शाळेची घंटा वाजण्याआधीच घणघणली वादाची घंटा

दिघ्यात शाळेच्या उद्घाटनावरून महायुतीमध्ये वाद

नवी मुंबई : नवी मुंबईतील दिघ्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शाळा बांधण्यात आली आहे. या शाळेचे उद्घाटन भाजप आमदार यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र या शाळेच्या उद्घाटनावरून महायुतीमध्ये वाद झाला असून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते एकमेकांना भिडले असल्याचं समोर आले.

राज्यात भाजप-शिवसेना सरकार सुखाने नांदत असताना नवी मुंबईत मात्र भाजप शिवसेनेचे विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा नवी मुंबईत दिसून आला आहे. येथील दिघा यादवनगर एमआयडीसी भागात नवी मुंबई महानगर पालिकेने शाळा बांधली आहे. याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन शिंदे गटाचे होते. मात्र त्या आधीच भाजप आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन करण्यात आले. याचा शिंदे गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला. भाजप गटाकडून देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

उद्घाटनस्थळी वाढता तणाव पाहता रबाळे पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. २०१४ साली देखील आघाडी सरकारमध्ये गणेश नाईक मंत्री असताना नेरूळमधील मनपा रुग्णालय उद्घाटन प्रसंगी सत्तेत सहभागी असून देखील दशरथ भगत यांच्यामार्फत असाच विरोध करण्यात आला होता.