नॉईस बॅरिअर जाताहेत चोरीला
ठाणे : ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेला 600 मीटर लांबीच्या खोपट-वंदना उड्डाणपुलावरील दोन्ही बाजूस लावलेले नॉईस बॅरिअर चोरीला जात असल्याने हा पूल वाहनचालकांसाठी धोकादायक बनू लागला आहे.
ठाणे महापालिकेच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या पुलाच्या देखभालीकडे पालिका प्रशासन आणि हे नॉईस बॅरिअर चोरणार्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे का, असा सवालही ठाणेकर नागरिकांकडून केला जात आहे. वंदना-खोपट उड्डाणपूल सार्वजनिक वापरासाठी खुला झाल्यानंतर ठाणे शहरातील विशेषत: राम मारुती रोड किंवा विकास कॉम्प्लेक्सकडे जाणार्या वाहतुकीची कोंडी कमी झाली, असा दावा ठाणे महापालिकेच्या अधिकार्यांनी केला आहे. हा उड्डाणपूल प्रवाशांसाठी खुला झाल्यावर सुमारे 50 टक्के वाहनांचा भार कमी झाला, असा विश्वास वाहतूक अधिकार्यांना आहे. उड्डाणपूल खुला झाल्यानंतर नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोडकडे जाणार्या सर्व स्कूल बसेस, व्हॅन्स आणि प्रवासी या पुलावर जात असल्याने अंतर्गत रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ सुमारे 50टक्के कमी झाली आहे. ठाणेकरांचा प्रवासही सुखकर होत आहे. मात्र सध्या वाहनचालकांसाठी हा उड्डाणपूल धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या उड्डाणपुलावरील दोन्ही बाजूकडील नॉईस बॅरिअर चोरीला जात असल्याची बाब समोर आली आहे तर काही ठिकाणी हे नॉईस बॅरिअर अर्धवट लटकतानाही दिसतात. चोरट्यांनी ते काढण्याच्या नादात अर्धवट सोडून दिल्याचे लक्षात येते. यामुळे शेजारील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना ध्वनी प्रदूषणाची त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या असल्याची बाब ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी निदर्शनास आणली आहे. या चोरट्यांवर बीट मार्शलमार्फत लक्ष ठेवून कारवाई करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.