आता नाल्यावर वाहनतळ आणि फेरीवाल्यांचे पुनर्वसन

वाहतूक कोंडीवर आणखी एक उतारा

ठाणे : ठाणे शहरातील नाल्यावर पार्किंग आणि फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे रस्त्यावरील पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या अडथळ्यातून ठाणेकरांची काही प्रमाणात सुटका होण्याची शक्यता आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ-मोठे नाले आहेत. ते उघडे असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. त्याची वर्षातून एकदा सफाई केली जाते, परंतु बंदिस्त नाले असतील तर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मुख्य १९ नाले बंदिस्त करून त्यावर पार्किंग किंवा फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे शहरातील प्रभात सिनेमा येथिल नाला बंदिस्त आहे. तेथे सध्या फेरीवाले धंदा करत आहेत तर के व्हीला येथिल नाला बंदिस्त करून तेथून कळवा येथे जाणारा रस्ता तयार केला जात आहे. कळवा येथे रेल्वे भागातील रस्ता बंदिस्त करून तेथून खारीगाव येथिल नागरिकांना कळवा रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता तयार करण्यात आला आहे.

तसाच प्रयोग शहरातील इतर नाल्यांवर करण्यासाठी आराखडा तयार करून त्याच्या अमलबजावणीसाठी राज्य शासनाकडे महापालिका अनुदान मागणार आहे. राज्य शासनाने अनुदान मंजूर केल्यास शहरातील १९ मुख्य नाले बंदिस्त केले जाणार आहेत. दाटीवाटीच्या क्षेत्रातील नाल्यावर पार्किंगची सोय करण्यात येणार आहे तर बाजारपेठ असलेल्या भागातील रस्त्यावर फेरीवाल्यांचे पुनर्वसन करून तो भाग फेरीवाला क्षेत्र जाहीर केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त श्री.बांगर यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या कमी होऊन रस्ता ठाणेकरांना मोकळा मिळणार आहे.